सुखाचा वारा – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/06/banner3-11.jpg

   सुखाचा वारा

Posted By :

  

    सुरेखा ताई, खरं तर त्यांना आजीच म्हणायला हवं या वयाच्या त्या आहेत. नावाप्रमाणेच सुरेख,कुठेही तसूभर जास्तीचे मास नाही.चापूनचोपून नेसलेली साडी,केस नीटनेटके त्यांना शोभतील असे बांधलेले आणि चेहऱ्यावर असं हसू की जगात सगळ्यात सुखी त्याच आहेत. त्यांचं हे देखणं रूप कोणावरही छाप पाडेल असं असलं तरी त्या कधीही आपल्या रूपाचं कोणाला ओझं होईल असं वागत नाहीत. माया,प्रेम जिव्हाळा त्यांच्या प्रत्येक हालचालीतून जाणवत असे.

     आम्ही जेव्हा त्यांच्या वृद्धाश्रमात  काही कामानिमित्त जात असू तेव्हा त्या आपल्या जागेवर आवरून बसलेल्या असत. आमच्याकडे बघून छानसं हसत,आम्हाला विचारत, “कसं आहात ताई?” आम्ही म्हणत असू, “छान” पुढे त्या म्हणत, “घरीदारी सगळं छान?” आम्ही म्हणत असू , “हो” यावर त्या सुरेख हसत.आणि  आम्ही आमच्या कामासाठी पुढे जात असू.

        सुरेखा ताईंचे आयुष्य तेवढंच होतं का? त्या खूप सुंदर गाणी गायच्या.विशेष करून प्रेमाची गाणी. त्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरत असे.आम्हीही त्यांचा हा एक गुण म्हणून त्याकडे बघत असू.पण त्याबद्दल कधीही बोलणं झालं नाही. सतत पुढची काम दिसत असल्याने मागे पायरीवर,खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या मनात वेगळं काही चालू असेल,त्याचा माणसाविषयीचा अनुभव वेगळा असेल असं का वाटलं नाही आम्हांला? याची फार खंत वाटली.जेव्हा त्यांच्या भाच्चीने सांगितले की माझ्या मावशीच्या आयुष्यात सुखातला ‘स’ सुद्धा कधी आला नाही.हे आम्ही ऐकलं तेव्हा फार धक्का बसला.कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू तर किती सुखाचे, निर्मळ,प्रेमाचे होते.आणि अशी व्यक्ती आयुष्यभर दुःखी होती.गेली वीस वर्षे त्या वृद्धाश्रमात राहत होत्या.त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता तो ही ५०-५५ वर्षापूर्वी.पण एक वर्षाच्या आत सगळच बिनसलं आणि त्यांच्या नशिबी एकटं राहणं आलं.नंतर इतर नातेवाईकांनी सुचवल्याप्रमाणे त्या शांतपणे वृद्धाश्रमात आल्या आणी तिथल्याच होऊन गेल्या.त्या आपलं गाणं आत गात होत्या पण इतरांना मात्र त्यांनी सुखाचं चांदणं शिंपडलेलं गाणं ऐकवलं. त्यातही प्रेमाचा झरा त्यांनी वाहत ठेवला.माणसांशी बोलायला हवं मग कितीही कामाचा रगाडा असला तरी. कोणी सांगावं आपल्या असण्यानं त्यांच्या आतल्या गाण्याला सुद्धा किंचितसा सुखाचा वारा लागेल.

वंचित विकास कार्यालय – 7972086730