संवादी बनूया….. – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/12/discussion-1.jpg

संवादी बनूया…..

Posted By :

घरातल्या माणसांची आपल्याला खूप सवय असते.त्यामुळे ती आपल्या भोवती असे पर्यंत आपल्याला त्यांचे अस्तित्व लक्षात येत नाही.पण ती कुठे गावाला गेली किंवा काही आजारामुळे आपल्याला सोडून गेली की आपण बैचेन होतो. समीर जेव्हा संस्थेत आला तेव्हा असंच त्याचं काहीसं झालं होतं.

   समीरने एक दिवस संस्थेत आर्थिक मदत देण्यासाठी फोन केला. असे फोन आम्हांला नेहमीच येतात.माणसं त्या त्या क्षणी भावूक झालेले असतात.त्यांना समाजासाठी काहीतरी करावं असं मनापासून वाटतही असतं.पण नक्की काय करावं हे मात्र लक्षात येत नाही.सोप्पी मदत आणि पटकन करता येणारी पैशांची मदत असते.आम्हांला वाटलं समीरच्या मनातही तसंच काहीसं असेल.म्हणून आम्ही त्याला संस्थेत यायला सांगितलं.त्यानिमित्ताने माणूस भेटतो.त्यात फक्त रुक्ष व्यवहार राहत नाही.

    समीर आला तेव्हा तो अस्वस्थ होता.त्याला खूप बोलायचं होतं.तो म्हणाला, “कोरोनाच्या काळात त्याची आई एका गंभीर आजारामुळे गेली.आता तो घरात एकटाच आहे.घर खूप भकास वाटतं.नातेवाईक आहेत आणि ते चांगलेही आहेत.पण तरीही मन सतत अस्वस्थ होतं.बैचेन राहतं.म्हणून कोणीतरी मला लहान मुलांना मदत करण्याचा सल्ला दिला.मलाही वाटलं,करून बघू या.म्हणून मी फोन केला.”   समीर बोलत होता त्यापेक्षा त्याचे डोळे अधिक काही सांगत होते.त्याला भरभरून बोलायचं तर होतं.पण संस्थेला मदत करण्याच्या निर्णयापर्यंत तो कसा आला हे त्यात सर्वात महत्वाचं होतं.तुम्ही एक रुपयाची मदत करा की अनेक रुपयांची.पण तो निर्णय घेतांना तुम्ही कुठून कुठपर्यंत पोहचतात हे फार महत्वाचं आहे.तुमच्या मनात असणारं दुःख,खंत यांना त्यातून वाट मिळते आहे का? समीरने संस्थेला भेट दिल्यामुळे,तो आमच्याशी बोलल्यामुळे, त्याने केलेल्या संपर्कामुळे त्याला ती वाट मिळाली.तो अगदी स्वस्थ झाला.हे आमच्यासाठी खूप महत्वाचे होते.कारण आपण माणसांसाठी काम करतो ना? ती नाराज,खंत करणारी असली तर स्वस्थ कशी होतील. म्हणून संवाद साधू या.

वंचित विकास कार्यालय – 7972086730