‘वंचित विकास’ डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला एक दुवा – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/08/mediator-finds-compromise-in-conflict-situation-vector-35100141.jpg

‘वंचित विकास’ डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला एक दुवा

Posted By :

Blog No.20

ही गोष्ट आहे शंकरदादा गंगावण्यांची. शंकरदादा आता ब्याण्णव वर्षांचे आहेत. डायस प्लॉट या पुण्यातल्या वस्तीत ते आणि त्यांची दोन मुलं असे रहातात. पूर्वी तरुणपणात आणि त्यानंतरही झेपत होतं तोवर दादा ओझी उचलण्याची कामं करायचे. आता या वयात होत नाही आणि प्रयत्न केला तरी काम मिळत नाही. हळूहळू त्यांची नजर कमी होत गेली. डॉक्टर म्हणाले की दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू झाला आहे. दिसणं बंद झालं एक दिवस.

काही दिवसांपूर्वी एका कार्यकर्त्यानी वस्तीत एक शिबीर घेतलं. डोळ्यांसाठी तपासणी. दादांचे डोळे तपासून झाल्यावर त्यांना सांगितलं की त्यांना न्यायला एक दिवस गाडी येईल, दवाखान्यात घेऊन जाईल आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं की परत आणून सोडेल घरी. मी वस्तीत कामाला जात असताना दादा मला रोज त्यांच्या घरापुढच्या रस्त्याच्या कडेला बसलेले दिसायचे. कुणाची तरी वाट बघत असावेत असं वाटायचं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून. मी एक दिवस थांबून त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की त्यांना न्यायला गाडी येणार आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून वाट बघतो रोज आणि मग पट्कन मला म्हणाले, “तू देशील करुन? मी पार्टी देईन तुला”. मी हसले आणि म्हणाले करुया आपण तुमचं ऑपरेशन.

देसाई हॉस्पिटलमधे दिनेश सरांना फोन केला तेव्हा ते म्हणाले की आपल्या शिबिराची चिठ्ठी हवी. मी चौकशी करुन जिथे शिबीर होतं तिथे जाऊन चिठ्ठी घेऊन आले. त्यांच्या मुलास तयार केलं आणि दादाचं ऑपरेशन मोफत झालंसुद्धा.

परवा मी वरच्या बाजूला कामाला गेले होते तेव्हा दादांनीच मला आवाज दिला. मी त्यांच्या जवळ गेले आणि विचारलं, “दादा!दिसतं का आता व्यवस्थित”. आणि गंमत म्हणजे दादा म्हणाले, “निळा ड्रेस छान आहे तुझा”. त्यांनी मायेनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. दादांना दिसत तर होतंच, पण त्यांनी मला आवाजावरुन ओळखलं होतं.

किती आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला. समाधान वाटलं. आपण फक्त मदत केली. डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला एक दुवा वंचित विकास बनून.

(वंचित विकासची कार्यकर्ती श्रीमती शुभांगी ढोले यांनी हे काम केले) वंचित विकास कार्यालय – 7972086730