यशस्विनी – ३  / लक्ष्मी – Vanchit Vikas

यशस्विनी – ३  / लक्ष्मी

Posted By :

यशस्विनी – ३                 

लक्ष्मी

लक्ष्मी ही लातूर जिल्ह्यातील आलमला गावची. दहावी पास.पण चौदाव्या वर्षीच तिचे लग्न झाले. नवरा चांगला होता. पण टायफाईड चे निमित्त झाले आणि नवरा गेला. त्यावेळी लक्ष्मीला अडीच वर्षांचा मुलगा होता. विधवेला घरात स्थान नसते. ना मानाचे ना हक्काचे. सासर परके झाले होते. अशा वेळेस मुलीला पुन्हा माहेरचाच आधार असतो. ऐन तारुण्यात, १९ व्या वर्षी लक्ष्मी विधवा बनली. माहेरच्या आधाराने राहू लागली. पदरात एक मूल होते. पुढचा विचार करणे गरजेचे होते. कोण करणार मार्गदर्शन? कोण दाखवणार दिशा? आपल्या समाजात विधवेला काही स्थान नसते. सर्व पवित्र कार्यात अपशकुनी समजून तिला बाजूला सारले जाते. अशा वेळेस कोण करणार योग्य मार्गदर्शन?

वंचित विकासच्या सबला महिला केंद्रात शिकून गेलेल्या महिलेकडून तिला केंद्राची माहिती मिळाली. ती स्वतः होऊन केंद्रात शिक्षण घ्यायला आली. माहेरच्यांनी तिला पाठिंबाच दिला. ती शिवणकाम शिकली. रांगोळी तर उत्तम काढायला शिकली. हळूहळू तिचा व्यक्तिमत्व विकास होऊ लागला.

केंद्रातून शिक्षण घेतल्यानंतर वर्षभर तिने शिवणकाम केले. पण काहींना आणखी काहीतरी करावेसे वाटत असते. त्यासाठी त्यांची धडपड चालू असते. खेडेगाव सोडून लक्ष्मी लातूरला आली. एका संस्थेत सेविका म्हणून काम करू लागली. अधून मधून ती सबला केंद्रात सहज चक्कर टाकत असे. शिकून गेलेल्या महिलांना लातूरचे  सबला महिला केंद्र दुसरे माहेरच वाटते. त्या केंद्रात हक्काने राहतात, जेवण करतात, मुक्काम करतात. केंद्रातील इतरांसाठी खाऊ पण आणतात. लक्ष्मी पण अशाच आपुलकीने संस्थेमध्ये येत असे.

एकदा तिला केंद्रात एस.ओ.एस. च्या चिल्ड्रेन्स व्हिलेज या संस्थेची माहिती मिळाली. सदन माता या पदावर तेथे जागा रिकाम्या होत्या. वंचित विकासच्या संचालक सुनीता जोगळेकर यांची तेथे ओळखही होती. लक्ष्मीने तेथे अर्ज केला. इ.स. २००६ मध्ये तिला एस.ओ.एस. बालग्राम मध्ये नोकरी मिळाली. ५ दिवसांचे तिचे तेथे प्रशिक्षण झाले. त्यानंतर तिला दिल्ली येथे दीड वर्षे आणि गुजराथ राज्यात एक वर्ष गृह्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सध्या ती लातूर येथेच बालग्राम मध्ये काम करीत आहे.

लातूरच्या बाजारपेठेत, गंज गोलाईत एकटीने जाण्यास घाबरणारी लक्ष्मी देशाच्या राजधानीत एकटी कशी गेली? कशी राहिली? ती म्हणते, “वंचित विकास संस्थेमुळे मला आत्मविश्वास मिळाला, धाडस प्राप्त झाले. विशेषतः चाफेकर सर, मीनाताई, सुनीताताई (दोघीही संस्थेच्या संचालक) यांच्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाले. भावनिक आधार मिळाला, म्हणून मी दिल्लीला एकटी जाऊ शकले, राहू शकले.”

आता मुलगा शिकत आहे. त्याला आजी (लक्ष्मीची आई) सांभाळते. त्यासाठी ती आईला दरमहा पैसे पाठवते. याशिवाय ती बँकेत दरमहा पैसे भरते. एल.आय.सी. चे हप्ते  पण भरते. “मुलाला खूप शिकवायचे आहे. स्वतःचे घर बांधायचे आहे.” अशी तिची स्वप्ने आहेत. आणि स्वप्ने पूर्ण करण्याची तिची जिद्द आहे.

अडचणीत असणाऱ्या बायकांना ती मदत करते, वंचित विकासच्या सबला महिला केंद्र, लातूर ची त्यांना माहिती सांगते, प्रसंगी महिलांना केंद्रात आणून सोडते. विधवा झाल्यामुळे तिचे जसे नुकसान झाले तसे इतरांचे होऊ नये, असे तिला वाटते. याच भावनेतून ती इतर महिलांना मदत करीत असते.

—————————————————————————————————————