यशस्विनी -१ – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/logo.jpg

यशस्विनी -१

Posted By :

यशस्विनी -१

वरदा

      वरदा ही लातूर जिल्ह्यातील शिवणीची. तशी उंच आणि अंगापिंडाने थोराड. आता पस्तिशीत आहे. पण लग्न झाले तेंव्हा ती फक्त बारा वर्षांची होती. लग्नाबाबत स्वप्न पाहण्याचेही हे वय नव्हते. पण झाले लग्न. आणि सारे बालपण कोमेजून गेले. सासरी ती आठ वर्षे राहिली. नवरा बाहेरख्याली होता, दारुड्या होता. वरदाला सारखी मारहाण करीत असे. वरदा नांदत असतानाच त्याने दुसरे लग्न केले. सासू सासरेही त्रास देत असत. मग कशाच्या आधारे सासरी रहायचे? त्यात दोन मुले झाली. नवऱ्याच्या वागण्यात काहीच बदल झालेला नव्हता. शेवटी कंटाळून सहा वर्षांचा एक आणि चार वर्षांचा एक अशा दोन मुलाना सासरी ठेवून ती माहेरी आली. त्यावेळी ती गर्भवती होती. तिला मुलगी झाली. तिलाच घेऊन ती माहेरी राहू लागली.

आता आयुष्य कसे जाणार, याची विवंचना तिला सतावत होती. शेतात मजुरी करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. अशातच वंचित विकासची एक कार्यकर्ती पंचशीला हिने तिला लातूरच्या सबला महिला केंद्राची माहिती दिली. पाच वर्षांच्या मुलीला आई वडिलांजवळ ठेवून ती शिकायला सबला महिला केंद्रात आली. पण मनात भीती होती. कारण नवरा लातुरलाच रहात होता. पण मन ‘धट’ करून ती आली. तिच्या भावाने पण तिला आधार दिला.

सुरुवातीला तिचे मन उदास होत असे. पण शिवणकाम, बकरीपालन, दाई प्रशिक्षण, कायद्याची माहिती, आरोग्य शिक्षण, खेळ, गाणी, गोष्टी, अशा केंद्रावरच्या कार्यक्रमात ती रमून गेली. हळूहळू तिचे व्यक्तिमत्वच बदलून गेले. त्यावर्षीच्या वर्गाच्या समारोपात हुंडाबंदी विषयीच्या नाटकात तिने एका पुरुषाची प्रभावी भूमिका केलेली होती.

वरदा जेंव्हा सबला महिला केंद्रात आली तेंव्हा तिचे शिक्षण केवळ ४ थी पर्यंतच झालेले होते. वाचणे, लिहिणे ती विसरून गेलेली होती. आता ती वाचू लागली, लिहू लागली. बोलायला शिकली. चार चौघात मिसळायला शिकली.

केंद्रात शिकून परत आल्यानंतर गावाकडे तिने शिवणकाम सुरु केले. तिने अंगणवाडीचा खाऊ बनविण्याचेही काम मिळविले. कधीमधी शेतात जाऊन ती मजुरीही करायला लागली. दिवसाकाठी दोन अडीचशे रुपये ती मिळवायला लागली. आयुर्विमा चे हप्ते भरायला लागली. इतर बचत ही करायला लागली.

आता तिला माहेरी सगळे ‘मुलगा’ म्हणूनच वागवतात. माहेरी सगळेच तिच्याशी चांगले वागतात.

एकीकडे तिने गावातल्या इतर महिलांसाठी  काम करण्यास सुरुवात केली. तिने एकटीने गावात वीस बचत गट सुरु केले. पंचशीला बचतगटाची ती अध्यक्ष आहे. तिने पंचशीला बचत गटास पावणेचार लाखाचे कर्ज मिळवून दिले. बचत गटामार्फत अकरा म्हशी घेतल्या. दुग्धव्यवसाय सुरु केला. सर्व बचत गटांची कर्जफेड वेळेवर होईल हे  पाहिले. त्यामुळे पुन्हा कर्ज मिळू लागले. इतके चांगले काम केल्यामुळे आदर्श महिला गृहउद्योग या संस्थेने वरदाचा सत्कार केला.

आता वरदाचे कार्यक्षेत्र वाढलेले आहे. गावातील महिला सक्षम करण्यात तिने पुढाकार घेतलेला आहे. महिलांना ती ग्रामसभेला, शाळेतील कार्यक्रमांना स्वतःबरोबर घेऊन जाते. तिच्यासारख्याच इतर अडचणीत सापडलेल्या महिलांना ती वंचित विकासच्या केंद्रात पाठवते. गावाच्या विकासकामात ही ती सहभागी असते.

एकदा ती विलासराव देशमुख यांना एकटी भेटली. आमच्या गावात पाण्याची सोय करा, वीजेची सोय करा, रस्ते बांधा अशा तिने मागण्या केल्या. ‘हिच्या मध्ये किती धीटपणा आहे’ असे उद्गार विलासराव देशमुख यांनी काढले आणि कौतुक केले. तिला तसे पत्रही पाठविले. पुढे विलासराव देशमुख यांच्या हस्ते तिचा सत्कारही झाला.

गावकरी तिला मान देतात व म्हणतात, ‘एवढी कमी शिकलेली असून इतके काम करते’. वंचित विकासमुळे तिच्यामध्ये इतका आत्मविश्वास आलेला आहे. अडचणीत सापडलेल्या महिलांना ती मदत करते. तिने तीन महिलांच्या नवऱ्यांची दारू बंद केली. त्यांचे संसार परत उभे केले. महिला तिला म्हणतात,’जसे वाळलेल्या झाडाला पाणी घालून ते झाड परत उभे करतात तसे आम्हाला तुम्ही साथ दिली आणि उभे केले’. गावात तंटामुक्तीचे कामही ती करते. गाव विकास समिती ची ती अध्यक्ष आहे.

सासरचे लोक तिला न्यायला आलेले होते. ‘पण काय म्हणून जायचे?’ असा प्रश्न विचारून तिने माहेरी जाण्यास नकार दिला. ‘माझ्या बाबतीत जे घडले तसे माझ्या मुलीच्या  बाबतीत घडू नये’ असे तिला वाटते. ती मुलीला खूप शिकविणार आहे. तिचे लग्न करून देणार आहे. स्वतःचे घर बांधणार आहे. गावासाठी पण तिला आणखी काम करायचे आहे.

वरदा अभिमानाने सांगते, वंचित विकास मुळे माझे भले झाले. केवढी मोठी शिदोरी संस्थेने दिली! मी संस्थेचे ऋण कधीही विसरणार नाही.

———————————————————————————-