यशस्विनी – १३ / विजया – Vanchit Vikas

यशस्विनी – १३ / विजया

Posted By :

     १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेली विजया बीड जिल्हयातील माळी चिंचोली गावची आहे. वयाच्या १९ व्या वर्षी तिचे लग्न झाले. पण ती सासरी फक्त दोन महिनेच राहिली. कारण अगदी विचित्र आहे. घरात हे असे असू शकते यावर विश्वासही  बसणार नाही. पण ते खरे आहे. विजयाच्या नवऱ्याचे त्याच्या सख्ख्या वहिनीशी संबंध होते. ते तिने स्वतःच्या  डोळ्यांनी पाहिले आणि ती माहेरी परत आली. विजयाने नवऱ्यावर केस केली.

     लातूरच्या सबला महिला kamagra forum italia केंद्रात शिकून गेलेल्या एका महिलेकडून तिला केंद्राची माहिती मिळाली. पण तेथे शिकायला जाण्याची तिला भीती वाटली. कॉलेजमध्ये मुले मुलींची छेड काढतात, सर्वत्रच असे चालते अशी समाजात समजूत असते. त्याचप्रमाणे अशा संस्था मुली विकतात अशी पण समजूत असते. अशीच काहीशी भीती विजयाच्या मनात होती. इतरांनी खूप समजावून सांगितल्यावर तिची समजूत पटली. वडील ‘जा’ म्हणाले. आई म्हणाली तुझे वडील सांगतील तसे कर.

     विजया लातूरच्या सबला महिला केंद्रात आली.केंद्रात दोनच पुरुषांची भेट झाली. एक चाफेकर सर आणि दुसरे भाऊ. त्यावेळी केंद्रात मुलींची काळजी घेण्यासाठी श्री.भाऊ पुरवत आणि श्रीमती पुरवत रहात असत. भाऊ सत्तरीचे तर ताई साठीच्या होत्या. सगळ्या मुली त्यांना ‘आई’ म्हणत असत. चाफेकर सर अधून मधून केंद्राला भेट देत असत. त्यांचा एक नियम होता, हे केंद्र महिलांचे होते, तेथे कोणीही एकटया पुरुषाने रहायचे नाही. त्यामुळे सर कधीही केंद्रात रहात नसत. या दोन्ही व्यक्ती विजयास चांगल्या वाटल्या. पुढे विजया केंद्रात रुळली. ती हुषार आणि तडफदार होती.

     सहाजिकच वंचित विकास संस्थेने विजयाला प्रशिक्षण झाल्यावर सबला महिला केंद्रात कार्यकर्ती म्हणून काम दिले. या केंद्रात ती अनेक वर्षे काम करीत होती. त्यानंतर लातूर मध्ये ती खोली करून राहिली. सध्याही विजया अशाच एका संस्थेत काम करीत आहे.

     तिचे नवऱ्या बरोबरचे  कोर्टातील भांडण मिटले. तडजोड झाली. कोर्टाने सुचविल्या प्रमाणे नवऱ्याने तिला घसघशीत नुकसान भरपाई दिली. त्यातून लाखो रुपयांची बचत विजयाने केलेली आहे. तिने घरही बांधलेले आहे. दरम्यान तिची आई वारली. वृद्ध वडिलांना घेउन ती राहते.

      विजयाचे वडील हे एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. कामधंदा काही करीत नाहीत. वय ही झालेले  आहे.  देवळाच्या पायरीवर, पारावर, कोठेही बसतात. त्यांना सर्व ठिकाणे सारखीच आहेत. चष्म्याचा नंबर वाढलेला असला तरीही सतत काही तरी वाचत असतात. बोलायला लागले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भरभरून बोलतात. त्यांचे विचारही ते सांगत असतात. एका लहान गावात इतका मोठा  विद्वान राहतो याची कोणाला जाणीव नाही. त्यांची उपेक्षा झालेली आहे याची त्यांना फिकीरही  नाही.

     विजयाच्या जडणघडणीत तिच्या वडिलांचा जसा वाटा आहे, तसाच सरांचा आणि वंचित विकासचाही मोठा वाटा आहे. विजयाने गावातील शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह नव्हते ते भांडून बांधायला लावले. ती ज्या संस्थेत काम करते त्या संस्थेमार्फत सामाजिक काम ती करतेच पण विशेष म्हणजे अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी विशेषत्वाने काम करते.

     वंचित विकास मध्ये काम करता करता विजया बी.ए. झाली. चाळीशीतील विजया पी.एच.डी  करण्याचे स्वप्न पहात आहे. एकटेच राहण्याचा निर्णय तिने घेतलेला आहे. वडिलांचे ती आपुलकीने करते. भावाच्या मुलाला ती कपडे वगैरे करते. पण कोणाही मुलाला सांभाळायचे नाही, एकटेच रहायचे असे तिने ठरवले आहे. नवऱ्याला सोडल्यावर एक स्थळ आले होते. पण तिने नकार दिला. तिला नोकरी करणे नको वाटते. तिला पीठाची गिरणी  सुरु करायची आहे. तिला वाचनाची, गायनाची आवड आहे. ती समाधानी आहे.

—————————————————————————————————————

–