यशस्विनी – ११ (ब)/ इशरत – Vanchit Vikas

यशस्विनी – ११ (ब)/ इशरत

Posted By :

     आश्चर्य म्हणजे इशरतचे लग्न तिच्या वयाच्या दहाव्या वर्षीच झाले. लग्न,नवरा,सासर,याचा अर्थ तरी या वयात कळतो का? पण झाले लग्न. तिचे आणि नवऱ्याचे सारखे भांडण होत असे. मग नवरा खूप मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून इशरत दोन वर्षातच माहेरी परतली.

     काही काळानंतर केंद्रात शिकून गेलेल्या महिलेकडून तिला लातूरच्या सबला महिला केंद्राची माहिती समजली. तिने केंद्रात जायचे ठरवले. घरच्यांनी ही पाठिंबा दिला. बुरखा घालूनच ती केंद्रात आली. ती पाचवी पर्यंत शिकलेली होती. पण तिला वाचता येत नव्हते. तेथूनच तिच्या शिक्षणाला सुरुवात झाली.

     मुस्लीम समाजात स्त्रीयांना नोकरीसाठी सुद्धा बाहेर जाता येत नाही, असे इशरत म्हणते. पण ती मात्र केंद्रातील शिक्षण संपल्यावर अंबेजोगाईच्या एम.आय.टी संस्थेत गृहमाता म्हणून रुजू झाली. मुस्लीम समाजाच्या दृष्टीने तिच्यातील हा बदल लक्षणीय होता. घराबाहेर पडायला, इतरांसोबत बोलायला आता तिला कसलीही भीती वाटत नाही, इतका आत्मविश्वास तिच्यामध्ये आलेला आहे.

     ती जे पैसे कमावते त्यातून दरमहा ती आईवडिलांना पैसे पाठवते. आयुर्विमा चा हप्ता भरते व सर्व खर्च भागवून बचतही करते.

          प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर नवऱ्याने तिला नांदायला नेले नाही. तिला रीतसर तलाक दिला व हुंडयाची रक्कम व लग्नाचा खर्च परत दिला.

     पूर्वी तिला असे वाटायचे की ती काही काम करू शकेल अथवा नाही. पण आता ती स्वतःच्या पायावर उभी आहे. अडचणीतील महिलांना ती मदत करते व मार्गदर्शन ही करते. हेच काम तिला मोठया प्रमाणावर करायचे आहे. लवकरात लवकर एक प्लॉट खरेदी करून घर बांधण्याचे ही तिचे स्वप्न आहे. 

—————————————————————————————————————