यशस्विनी – १० (ब) / शीतल – Vanchit Vikas

यशस्विनी – १० (ब) / शीतल

Posted By :

     ही कहाणी आहे शीतल नावाच्या मुलीची. वयाच्या १२ व्या वर्षीच तिचे लग्न झाले. या मुलीला लग्न,संसार,सासर, याची काय जाण असणार? पण तरीही तिने संसार केला. ती दहा वर्षे सासरी राहिली. या काळात तिला दोन मुले आणि एक मुलगी झाली. आजारपणात नवरा वारला. तिला सासर दुरावले. विधवा शीतल वयाच्या २२ व्या वर्षी माहेरी परत आली. इतरांप्रमाणेच घरची खूप गरिबी होती. भकासपणे आयुष्य कंठणे चालू होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील जागजी या गावी शेतात मजुरी करून ती पै पैसा साठवत होती. साठवणे कोठले? मिळेल तेच पुरत नव्हते. याच काळात शिकून गेलेल्या मुलींनी  तिला लातूर च्या सबला महिला केंद्राची माहिती दिली. संध्याताईनाही शीतलची माहिती त्या मुलींनी दिली. संध्याताई स्वतः जाऊन तिला भेटल्या. ती केंद्रात शिकायला आली.

     पाचवी पास झालेली शीतल लिहिणे वाचणे विसरून गेलेली होती. केंद्रात ती प्रथम साक्षर झाली. तिची अक्षर ओळख आणि अंक ओळख झाली. तुटकतुटक ती वाचू लागली. शिवणकाम शिकली. बकरी पालनाचे धडे तिने घेतले. केंद्रातील वातावरणामुळे तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.

     सबला महिला केंद्रातून बाहेर पडल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील रुदुबर या गावातील एका शाळेच्या वसतिगृहात ती कामाला राहिली. तेथे वर्षभर काम केल्यावर ती तिच्या गावी परत गेली. तेथे कपडे शिवू लागली. त्यानंतर तिने तीन शेळ्या खरेदी केल्या. शेळीच्या दुधास वास येतो म्हणून ते दूध कोणी घेत नाही. त्यामुळे तिने मटण विक्रीचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला बोलायलाही घाबरणारी शीतल शिवणकाम आणि बकरीपालन असे दोन्ही व्यवसाय करू लागली.

     तिचा एक मुलगा १२ वीत शिकत आहे. दुसरा मुलगा १० वीत आहे तर मुलगी ९ वीत शिकत आहे. तीन मुलांचे शिक्षण, आई वडिलांसह सर्वांचाच घरखर्च भागवून तिने बचत केलेली आहे. स्वतःची जागा खरेदी केलेली आहे. पत्र्याचे शेड तयार करून त्यामध्ये ती रहात आहे.

     तिला मुलांचे शिक्षण करायचे आहे. मुलीला शिकवून तिचे लग्न करायचे आहे. आपल्यासारख्या गरीब बायांना तिला मदत करायची आहे. अशी तिची भावी आयुष्याची योजना आहे.

     “वंचित विकास संस्थेमुळे माणूस म्हणून मी समाजात ताठ मानेने उभी आहे.” असे ती म्हणते.