यशस्विनी-१० (अ) / धोंडी – Vanchit Vikas

यशस्विनी-१० (अ) / धोंडी

Posted By :

     कोणी काही बोलले तरीही तोंड उघडायचे सुद्धा धाडस जिच्यामध्ये नव्हते ती धोंडी आज एकटी अन्यायाच्या विरोधात उभी राहते. तिच्यासारख्या अडचणीत सापडलेल्यांना आधार देते, मार्गदर्शन करते. धोंडीमध्ये हा बदल झाला तो सबला महिला केंद्रात शिक्षण घेतल्यामुळे. इतर अनेक मुलींप्रमाणेच धोंडीचे लग्न तिच्या वयाच्या 13 व्या वर्षीच झाले. ती सासरी केवळ चार वर्षे राहिली आणि एक तान्हे मूल पदरात घेऊन माहेरी परत आली. काय करणार? नवरा खूप दारू पीत असे. तो निष्कारण धोंडीला मारायचा. सासूही तिचा जाच करीत असे. या त्रासाला कंटाळून धोंडी माहेरी आली ती कायमचीच. पुढे सासरी जाण्याचा कधी प्रश्नच आला नाही. कारण अति मद्यपानामुळे तिचा नवरा लवकरच वारला.

      केंद्रात शिकून गेलेल्या एका महिलेमुळे तिला केंद्राची माहिती मिळाली. तिला केंद्रात जावेसे वाटले. घरच्यांनी सुद्धा तिला पाठिंबा दिला. ती केंद्रात आली. ती १० वी पर्यंत शिकलेली होती. शिवणकाम आणि इतर विषय शिकता शिकता ती बदलत गेली. शिकून गेल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा तिने निश्चय केला. सुरुवातीला दोन वर्षे ती एका डॉक्टर बाईंकडे राहिली. पडेल ते काम केले. या डॉक्टर बाई संस्थेच्या सल्लागार मंडळातीलच आहेत.

     त्यानंतर ती गावी गेली. अंगणवाडी मदतनिसाची तिला नोकरी मिळाली. ती नोकरी करून फावल्यावेळात शिवणकाम देखील करू लागली. आता हातात पैसा खेळू लागला. तिने विम्याचे हप्ते भरण्यास सुरुवात केली. ती बचत करू लागली.

     मुलाला खूप शिकवून नोकरीला लावण्याचे तिचे स्वप्न आहे. तिला स्वतःचे घरही बांधायचे आहे. घराचे स्वप्न तर एकदोन वर्षातच पुरे होईल असे दिसत आहे. मुलाबाबतचे स्वप्न पुरे होण्यास बराच वेळ लागेल.

     केंद्राबद्दल तिच्या मनात कृतज्ञता आहे. केंद्रामुळे आपण “माणसाचे” जीवन जगू लागलो असे तिला वाटते. त्यामुळे समाजातील गरीब व गरजू बायकांसाठी खूप काही करण्याची इच्छाही तिच्या मनात अंकुरलेली आहे.