माणुसकीचे दर्शन…. – Vanchit Vikas

माणुसकीचे दर्शन….

Posted By : VV Staff

एका स्वस्थ समाजाची निर्मिती करायची असेल तर समाजात शांतता व सौहार्दपूर्वक वातावरण हवे. सध्या जगात रशिया-युक्रेन युद्ध असो, ब्राझील मधील राजनीतिक सत्ता हस्तांतर हिंसाचार असो, अरब देशातील अशांतता, इस्राइल-पॅलेस्टाईन पुन्हा युद्ध सदृश्य परिस्थिती असो, पाकिस्तानातील महागाई, राजकीय अस्थिरता, माणुसकीला काळीमा फासणारी गव्हाच्या अवघ्या काही किलोच्या पिशवीसाठी पाशवी मारामारी असो. कोठेही जा माणुसकीची पायमल्ली सुरू आहे. अशी गंभीर चर्चा कार्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

त्याच दिवशी साधारण चाळीशीचा निम्न मध्यमवर्गीय गृहस्थ जुने कपडे देणगी दाखल द्यायला कार्यालयात आले होते. ते पिशवीतून जुने कपडे काढत असताना एक दिव्यांग व्यक्ती जो साधारण 20  ते 22 वयाचा आहे, तो काठी टेकवत भिंतीचा आधार घेत कार्यालयामध्ये आला. ही व्यक्ती काही महिन्यांपूर्वी कार्यालयात मदत मागायला आली होती. तो MPSC ची तयारी करणारा विद्यार्थी होता. आपल्या घरापासून लांब, जिद्दीने पेटलेला, मिळेल ते काम करणारा व्यक्ती होता. तो यापूर्वी  कार्यालयात आला होता. संस्थेने त्याला शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती. यावेळेलाही ती व्यक्ती मदत मागायला आली होती.

तो विद्यार्थी सोफ्यावर अलगद बसला आणि म्हणाला, “ मॅडम, आपण मागे केलेल्या मदतीला मी कधीही विसरणार नाही. माझी अंतिम मुख्य परीक्षा येत्या मे महिन्यात आहे. यानंतर मी माझ्या मूळ गावी परत जाणार आहे. मला मे महिन्यापर्यंतचे मेसचे व खोलीच्या भाड्यासाठी मदत हवी आहे. ह्या तीन-चार महिन्यात मला कोणतेही काम करता येणार नाही. संस्थेकडे न येता, माझी मी गरज भागवू पाहत होतो. पण हे शक्य झाले नाही. म्हणून आपल्याकडे आलो.”

हो, हे खरे होतं तो बऱ्याच दिवसांनी आला होता. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्यास संस्थेला नेहमी आनंद होतो. तुम्ही एक-दोन दिवस द्या. देणगीदारांशी बोलून तुम्हाला कळविते. असे त्यांना सांगितले.

त्या मुलाचा चेहरा एकदम उतरला. जुने कपडे पिशवीतून काढणारा व्यक्ती हे सर्व ऐकून बोलले, “बाळा, तुला किती पैसे हवे आहेत?”

“प्रति महिन्याचे मेसचे रुपये २००० आणि खोली भाडे रुपये १५००, असे एकूण रुपये ३५०० पुढील तीन महिन्यासाठी.”

देणगीदार व्यक्ती ही फार सधन वर्गातून होती असे नाही. पण मनाने फार सधन होती. ते बाहेर गेले एटीएम मधून रुपये ३५०० काढले आणि त्या विद्यार्थ्यांच्या हातात दिले आणि म्हणाले. “मला सध्या एवढे शक्य आहे. आणखीन तरतूद नंतर करीन.” त्या दिव्यांग व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले.

ह्या दोघांमध्ये काही मिनिटांच्या भेटीतच नाते निर्माण झाले. संस्थेमुळे हे दोघे एकत्र आले.

जागतिक परिभाषेत माणुसकी संपली असे कितीही संकेत वर्तमानपत्रात येऊ दे, ती जिवंत आहे याचे हे उदाहरण आहे.

 देणगीदार व्यक्तीने त्या दिव्यांग व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला व आधार देत ते दोघे बाहेर गेले. आम्ही सर्व कार्यकर्ते त्या दोघांकडे पाहत राहिलो.

वंचित विकास कार्यालय – 7972086730

Audio Version Link – https://youtu.be/X4b3BM-AThc