“मनावरील डाग” – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/04/blog12-1.jpg

“मनावरील डाग”

Posted By :

      “ ताई,एकदा मुलाचं लग्न झालं की मग मी मोकळे” मीनलताई म्हणाल्या.

“ अहो,उलट जास्त अडकाल,मोकळं कसं होणार?” मी म्हटलं. सर्वसामान्य स्त्रिया असं नेहमी म्हणत असतात आणि परत आपल्या दैनंदिन कामात अडकतात. हे माहित होतं.म्हणून मी असं म्हणाले. एखाद्या व्यक्तीची  इतरही काही अडचण असू शकते, हे आपल्या लगेच लक्षात येत नाही.

    “छे छे मी मोकळी म्हणजे मोकळी,मुक्त होणार आहे.”हे म्हणतांना मीनल ताईच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्या आपलं जे दुःख लपवत होतं ते भराभर बाहेर येऊ लागलं.

  मामला अधिक गंभीर होता,सहज घेण्यासारखा नव्हता. “काय झालं मीनलताई? बोला तुम्ही” त्या नेहमी येणाऱ्या नव्हत्या.पण अधूनमधून यायच्या तेव्हा फारसं काही बोलायच्या नाहीत. एकतर त्या रोज  कामासाठी पुणे-मुंबई अपडाऊन करायच्या,त्यामुळे त्यांच्याकडे स्वतःसाठी सुद्धा वेळ नव्हता.

छान बँकेतील नोकरी, पुण्यात घर यांना काय दुःख असेल असं कोणालाही वाटू शकतं. अशा व्यक्तीला  काही अडचण असेल असं कोणी मानायला तयार होत नाही. त्यामुळे अशी माणसं स्वतःच्या खऱ्या भावना कायम दुसऱ्या पासून लपवून ठेवतात.

मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला,आणि आश्वासन दिलं,तुमच्यावर माझा विश्वास आहे हे ही कृतीतून सांगितलं, तेव्हा मोठ्या मुश्किलीने मीनलताई बोलू लागल्या.

“ताई मी २५ वर्षापासून पुणे-मुंबई अपडाऊन करते.लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी माझ्या अंगावर पांढरा डाग दिसला. डॉक्टर म्हणाले की हे प्रदूषणामुळे होऊ शकतं. कारण तो डाग आहे तेवढाच राहिला,त्यात वाढ झाली नाही.”

 मी परत त्यांना थोपटलं. तर त्या रडूच लागल्या आणि म्हणाल्या, “पण तेव्हापासून माझा नवरा दुसऱ्या खोलीत झोपतो. तो माझ्याशी बोलत नाही की माझ्याशी संपर्क ठेवत नाही.”

  आज मीनलताईचे वय ५५ आहे,त्या गेली पंचवीस वर्षे हे सहन करत आहेत.मुलासाठी त्या त्या घरात राहिल्या. मुलाचं सगळं नीट व्हावं असं त्यांना वाटत होतं.आपल्यामुळे मुलांच्या आयुष्यात समस्या यायला नको. ही त्यांची इच्छा होती,म्हणून त्यांनी घर सोडलं नाही आणि गावातली नोकरीही घेतली नाही.म्हणून त्या आता म्हणत होत्या की मुलाचं लग्न झालं की त्या वेगळं राहणार.

   पांढरा डाग आलेल्या स्त्रीचा पैसा चालणार होता,तिने घरात दिलेल्या सोयी हव्या होत्या,पण तिचा सहवास नको होता. शिकलेली माणसं ही अधिक  असंवेदनशील होत जातात का? त्यांच्या मनात असे अनेक डाग असतात का? जे माणसाला एकमेकांपासून वेगळं करतात. घरातल्या एखादीला  असं वाळीत टाकणं किती भयंकर आहे? हे आपल्या कधी लक्षात येणार?        पण मीनल ताई बोलल्या,म्हणूनच त्यांना मार्ग सापडला. नाही का?

वंचित विकास कार्यालय – 7972086730