फुलवा कथांच्या निमित्ताने / प्रस्तावना – Vanchit Vikas

फुलवा कथांच्या निमित्ताने / प्रस्तावना

Posted By :

     शरीर विक्रय करणार्‍या महिलांच्या मुलांसाठी  लोहगाव,पुणे येथे इ.स.१९९० मध्ये वंचित विकास संस्थेचे  नीहार’ हे निवासी केंद्र  सुरु झाले. पण इमारत आणि जागेच्या मर्यादेमुळे ’नीहार’ मध्ये  केवळ १०० मुलांनाच प्रवेश  देणे शक्य होते. लालबत्ती विभागात खूप मुले राहतात. काही जवळच्या शाळेत जातात. लहान मुले जेथे आई व्यवसाय करते तेथेच घुटमळत राहतात. काहींना पलंगाखालीच झोपवले  जाते. अनेक मुले आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये खेळत बसतात. रात्र झाली की मुले दुकानाच्या फळीवर उपाशी पोटी झोपून जातात. या मुलांचे भवितव्य काय?

     यासाठी एक प्रकल्प योजना तयार केली गेली. संस्थेचे संस्थापक श्री. विलास चाफेकर यांनी या प्रकल्पाचे नाव ’फुलवा’ असे सुचविले. फुलवाचा अर्थ अनेक प्रकारच्या फुलांचा गुच्छ! मॉरिस ट्रस्टच्या अर्थसहाय्याने १ सप्टेंबर २००५ पासून फूलवाच्या कामाला सुरुवात झाली. फुलवा केंद्रात विविध प्रकारची मुले येतात. मुलांचे बालपण जपण्याचे काम फुलवा मध्ये केले जाते. फुलवा प्रकल्पामध्ये,

 १) पाळणाघर, २) बालवाडी, ३) अभ्यासवर्ग, ४) अनौपचारिक शिक्षण,  हे उपक्रम चालविले जातात. फुलवा हा प्रकल्प नीहार ला पूरक आहे.

     फुलवा प्रकल्पाचे मुख्य हेतू या प्रमाणे आहेत,

लालबत्ती विभागामधील १) मुलांचे मूलपण जोपासणे, २) व्यक्तिमत्व विकासास पूरक वातावरण निर्माण करणे. ३) मुलांना भावनिक आधार देणे, ४) या मुलांचे शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे, ५) अनौपचारिक व व्यावसायिक शिक्षण पद्धतीद्वारे काम करणार्‍या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे, ६) बालमजूरी कमी करणे, ७) मुलांचे आणि त्यांच्या आईचे  शोषण कमी करण्याचा प्रयत्न करणे, ८) मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी पुनर्वसन करणे संबंधी योजना आखणे, ९) शरीर विक्रय व्यवसायातून बाहेर पडावयाचे असेल तर त्या स्त्रीस मदत करणे.

     फुलवा मध्ये ४ महिन्यांच्या बाळापासून १८ वर्षांपर्यंतची मुले येतात. बालवाडीच्या मुलांची वेळ १२ ते ३ आहे. अनौपचारिक वर्गातील मुलांची वेळ अनिश्चित असते. ही मुले काम करणारी असतात.  त्यामुळे ती त्यांच्या सुट्टीच्या वेळात जमेल तसे येतात. अभ्यासवर्गातील मुले शाळेत जाणारी असल्यामुळे ती शाळेच्या आधी, शाळा सुटल्यावर आणि शनिवारी दुपारी येतात.

     फुलवा मुलांचे घर आहे. येथे मुले आंघोळ करतात. जेवतात, झोपतात, आराम करतात, कपडे धुतात, अभ्यास करतात, त्यांच्या महत्वाच्या वस्तू ठेवतात, छान छान सृजनशील कार्यक्रम करतात.

     फुलवातील वातावरण खूप मोकळे आहे. मुलांना फुलवामध्ये खूप सुरक्षित वाटते. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सुरक्षितता या सर्वच गोष्टी येथे मुलांना मिळतात. मुले त्यांचा सर्व ताण येथे आल्यावर विसरतात. ती हसतात, खेळतात, बोलतात, मन मोकळे करतात.  समुपदेशक त्यांचे सर्व बोलणे ऐकतात आणि योग्य तो सल्ला ही देतात. ही मुले तो सल्ला ऐकतात हे चिशेष! हे फुलवाचे यश आहे.

     मुले येथे व्यक्त होतात. ज्या मुलांना घर नाही, ज्यांना आई वडील नाहीत ती मुले जास्त वेळ फुलवामध्ये येतात. फुलवाचे घरपण अनुभवतात. मुले आजारी असली, शाळेत गेली नाहीत, कामावर गेली नाहीत तर ती फुलवामध्ये येतात. त्यांना येथे मोकळे वाटते.

     फुलवामधे सकस जेवण आणि आरोग्यवर्धक खाऊ दिला जातो. येथे दरमहा मुलांची वैद्यकीय तपासणी केली जाते. मुलांना काही आजार असेल तर त्यावर इलाज केला  जातो. फुलवाचे घरपण त्यांना जगण्यासाठी उभारी देते. फुलवामध्ये सर्व जाती जमाती, धर्माचे सण समारंभ साजरे केले जातात. राष्ट्रिय सण साजरे केले जातात. मुलांच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध स्पर्धा घेतल्या जातात.

फुलवाच्या कामामुळे मुलांवर झालेले सकारात्मक परिणाम खालील प्रमाणे  दिसून आलेले आहेत.

अ) पाळणाघर –

१) शरीरविक्रय करणार्‍या महिलांच्या मुलांचे संगोपन व्यवस्थितपणे आणि जबाबदारीने फुलवामधील पाळणाघरात केले जाते.

२) बाळे आणि मुले स्वच्छ ठेवली जातात.

३) बाळांना होणार्‍या संक्रमित आजारपणाचे प्रमाण कमी झालेले आहे.

४) सकस आहार  दिल्यामुळे बाळांचे कुपोषित राहण्याचे प्रमाण कमी होत आहे.

५) बाळांचे लसीकरण नियमित केले जाते.

६) ३ महिन्यापासून  बाळांना   पाळणाघरात ठेवले जाते.

७)  बाळांसाठी पाळणा आहे, झोळी बांधली जाते, त्यांना वाटी चमच्याने दूध पाजले जाते.

ब) बालवाडी – 

१) मुलांना शी-शू चे भान आलेले आहे.

२) मुले स्वच्छ रहायला लागली आहेत.

३) मुले लालबत्ती वस्ती मधील वातावरणा पासून साधारण्तः आठ तास दूर राहतात.

४) मुलांची अवधान कक्षा वाढलेली आहे.

५) मुले नियमित नखे कापण्यास शिकली, आंघोळ करण्यास शिकली,

६) अमराठी भाषिक मुले उत्कृष्ट मराठी बोलतात.

७) मुले कविता आणि गाणी गुणगुणतात.

८) लिहिण्या वाचण्याच्या दृष्टीने मुलांची तयारी होईल असे कृती कार्यक्रम घेतले जातात.

९) मुले नियमित प्रार्थना, भजने, गाणी म्हणतात.

१०) मुले स्वतःहून चित्रे काढतात व ती रंगवतात.

११) मुले वेगवेगळे बैठे व मैदानी खेळ उत्साहाने खेळतात.

१२) मुले वेगवेगळे रंग ओळ्खायला लागलेले आहेत.

१३) मुले वेगवेगळ्या भाज्या, फळे, पक्षी, इ. ओळ्खायला लागले आहेत.

१४) बालवाडीमुळे मुलांचे मूलपण जोपासले जाते.

१५) मुलांना वेगवेगळ्या कामात गुंतविल्यामुळे मुलांचा रागीटपणा आणि हट्टीपणा कमी झालेला आहे.

क) अभ्यासवर्ग –

     या वर्गातील मुलांची व्यसने, शिव्या देणे, मारामारी करणे याचे प्रमाण कमी झालेले आहे. अभ्यासाची सवय लागली. अवधान कक्षा वाढली. एका जागी बसून काम करणे, अभ्यास करणे याची क्षमता वाढली. मुले भावनांवर नियंत्रण मिळविण्यास शिकली. उदा. एखादी वस्तू हवी असेल तर ती मागून घेणे, हिसकावून न घेणेस शिकली. आक्रस्ताळेपणा न करता रागावर नियंत्रण मिळविण्यास शिकली.

     अभ्यासवर्गातील मुलांचा अभ्यासाचा पाया भक्कम होण्यास मदत झाली. मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी  झाले. जी मुले शाळा सोडतात त्यांना आम्ही पुन्हा शळेत घालतो. त्यामुळे शाळा गळतीचे  प्रंमाण कमी होण्यास मदत झालेली आहे. बालवाडीला येणारी मुले वयाच्या ६ व्या वर्षी शाळेत दाखल होतात किंवा आपणच जवळच्या शाळेत त्यांचे नाव दाखल करतो.

     शाळेत सांगितलेले प्रकल्प मुले फुलवामध्ये करतात. हस्तकलेचे नमुने, मातीची फळे, झेंडे, भेटकार्ड, या वस्तू फुलवा मध्ये करतात. कारण घरात हे सगळे करायला जागा नाही. प्रोत्साहन देणारे कोणीही नाही. ही गरज फुलवा मधून भागविली जाते. 

     आता, मुलांमध्ये ह्ळूह्ळू शिस्त निर्माण होत आहे. बालवाचनालय आणि वर्तमानपत्रे यामुळे  वाचनाची सवय लागली. अभ्यास व इतर प्रकल्प, वैज्ञानिक प्रकल्प यामुळे शिकण्यातील रस वाढत आहे. मुलांना बचतीची सवय लागलेली आहे. मुलांना संगणक हाताळायला मिळत असल्यामुळे त्यामधील विविध तंत्रे मुले शिकली. फुलवा हे वस्तीतील मुलांसाठी अभ्यासाचे वातावरण असलेले केंद्र झालेले आहे.

ड) अनौपचरिक वर्ग –

     प्रत्येक मुलाच्या वयाचा, बौद्धिक पातळीचा, पूर्व शैक्षणिक क्षमतेचा विचार करून त्याप्रमाणे मुलांचा अभ्यास घेणे हे अनौपचारिक वर्गाचे उद्दिष्ट आहे. उदा. सातवीमध्ये शाळा सोडलेल्या मुलाचा त्याच्या क्षमतेनुसार अभ्यास घेतला जातो.  शाळेत न गेलेल्या मुलाचा प्राथमिक पातळीपासून अभ्यास  घेतला जातो. व्यवसाय प्रशिक्षण, शालेय परीक्षा बहिःस्थ पद्धतीने देण्यास प्रवृत्त केले जाते.

इ) अभ्यासवर्ग आणि अनौपचारिक  वर्गाचे  परिणाम –

१) मुलांना अभ्यासाचे महत्व पटत आहे. आत्ताच कष्ट करा अन्यथा तुम्हाला पुढे आयुष्यभर कष्ट करावे लागतील या गुरुमंत्राचा उलगडा मुलांना होत आहे.

२) गरीब परिस्थितीमुळे जी मुले खेळ, कृती इ. बाबत विचारही करू शकत नव्हते, ते आता खेळ आणि कृती चा आनंद फुलवामुळे उपभोगत आहेत.

३) जीवन कौशल्याच्या नियमित सत्रांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्वा मध्ये सुधारणा होत आहे.  

४) या वर्गांद्वारे मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळते, काम करणार्‍या मुलांमध्ये पुढे शिकण्याची जिद्द निर्माण झालेली आहे. अनेक मुले स्वयंप्रेरणेतून बाहेरून परिक्षेस बसत आहेत.

५) नियमितपणे व्यावसायिक शिक्षणास प्रेरित केल्यामुळे उपजिविकेसाठी  चांगली नोकरी मिळेल अशी मुलांमध्ये आशा निर्माण झालेली आहे.

६) मुलांचा आपल्या आईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेला आहे. मुलांना आईबद्दल प्रेम वाटेल  अशी शिकवण दिली जाते.

७) मुलांच्या वाईट सवयी, शिव्या देणे, चोर्‍या मार्‍या करणे, इ. चे प्रमाण कमी झालेले आहे.

८) मुलांना पैसे साठविण्याचे महत्व पटत आहे.

९) मुले स्वच्छ आणि नीट नेटके रहात आहेत.

१०) मुले स्वप्रेरणेने सुंदर चित्रे काढतात, रंगवितात, व कृत्रिम दागिनेही उत्तम तयार करतात.

११) मुले मानसिक्दृष्ट्या सक्षम झालेली आहेत.

१२) मुलांना चांगल्या आणि वाईट गोष्टींचा फरक कळत आहे.

१३) बर्‍याच मुलांना आजूबाजूच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला जातो.

१४) भिन्न परिस्थितीतून आलेल्या मुलांना फुलवाच्या छत्राखाली सामावून घेऊन, त्यांचा कल पाहून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रेरित केल्यामुळे मुले आनंदाने बाहेरच्या जगामध्ये एकरूप  होण्याचा प्रयत्न करतात.

१५) एकूणच मुलांच्या विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जाते.

     फुलवाकथामालेच्या निमित्ताने आम्ही  फुलवामध्ये येणार्‍या  मुलांच्या कथा घेऊन येत आहोत. सर्व कथा खर्‍या असून वास्तव जीवनाशी निगडीत आहेत. मुलांची फक्त नावे बदलेली आहेत.

वंचित विकास

(१५/०८/२०२०)