निखळ मैत्र हवं – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/12/nikhal-maitri1.jpg

निखळ मैत्र हवं

Posted By :

Blog No.4

सोनाली सहज भेटायला आली.ती अशी अधूनमधून तिच्या कामातून मोकळी झाली की भेटायला,तिच्या क्षेत्रातल्या गंमतीजंमती सांगायला येत असे.ती आली की आजूबाजूचे वातावरण अजूनच उत्साही होत असे. सोनालीकडे उत्तम fashion सेन्स आहे.ती स्वतः एवढी छान राहतेच,पण दुसऱ्याला सुद्धा तसं राह्यला भाग पाडते. इतक्या हसऱ्या,बोलक्या आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या व्यक्तीला काय खंत असणार? असं मनात आलं.कारण आज सोनाली आली तेव्हा एकदम शांत होती.

    आमचे सुरुवातीचे बोलणं झालं,घरच्या,कंपनीच्या,तब्येतीच्या सर्व चौकश्या करून झाल्या.पण तिच्याकडून एकही अशी टिप्पणी आली नाही की, ज्यावर आम्ही खळखळून हसू.मग लक्षात आलं की, बाई साहेबांचा आज वेगळाच मूड आहे. ती नजर चुकवत बोलत होती.शेवटी विचारलं काय झालं सोनाली? बरी आहेस ना?

“हो तर, मला काय धाड भरली आहे.”

“मग? ब्रेकअप झाला की काय?”

“काहीतरीच,अग ब्रेकअप व्हायला कोणाशी जुळायला तर हवं ना?”

  थोडावेळ तसाच जाऊ दिला,ती काहीतरी बोलेन याची वाट पाहिली. तसं करणं अगदी योग्य होतं हे लगेचच लक्षात आलं.

“मला अशी मैत्री हवी ज्यात शरीर मध्ये येणार नाही.कोणीतरी माझ्याशी बौद्धिक संवाद साधेल.भावना व्यक्त करतांना सुद्धा अंगचटी येणार नाही.”

  “हं ” मी म्हटलं.पण सोनाली तिच्याच तंद्रीत होती.

मी अशी आहे म्हणजे मला मन,बुद्धी काहीच नाही का? माझ्या फक्त शरीराचाच का विचार केला जातो.मला आवडत नाही असं.अरे चांगल्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारा,नवीन गोष्टी समजून घ्या. पण यांना फक्त शरीर हवं असतं.”

  सोनाली ही ट्रान्स जेंडर आहे.ती उत्तम शिकली असून चांगल्या ठिकाणी नोकरी करते. पण तिला बौद्धिक भूक असू शकेल यावर कोणी विश्वासच ठेवत नाही.ती ही एक माणूस आहे. तिलाही आपल्यासारखी वाचनाची आवड असू शकते,तिची काही मतं असू शकतात.यावर आपण का  विश्वास ठेवत नाही कोणी?

     सोनाली अशा मैत्रीच्या शोधात आहे जी तिच्याकडे शरीराच्या पलीकडे बघेन. तिला अशा संवादाची गरज आहे जो तिच्या बुद्धीची भूक भागवेन. आज सोनाली बोलली म्हणून एवढं सगळं कळलं. खरंच बोलू या एकमेकांशी. करू या निखळ मैत्री.

वंचित विकास कार्यालय – 7972086730