नजर बोलते – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/12/maxresdefault1.jpg

नजर बोलते

Posted By :

“मी एकदम चांगला राहतो, रोज व्यायाम करतो.माझी कामं मला जशी जमतील तशी स्वतःच करतो. जी माझ्याकडून होत नाहीत त्यासाठी कोणाची तरी मदत घेतो.किंवा पैसे देवून करून घेतो.शक्यतो आनंदी राहतो.चांगलेचुंगले कपडे घालतो.माझं व्यवस्थित चालू आहे.” काका आम्हांला सांगत होते.

   एवढं सगळं नीटनेटकं आहे,मग त्यांना कसली मदत हवी आहे?त्यांना काय बोलायचं आहे हेच आम्हांला कळत नव्हतं.मग तेच पुढं म्हणाले, “अहो मला लोकांच्या नजरेचा,त्यांच्या एखाद्या शब्दाचा मला त्रास होतो.”

त्यांना काय म्हणायचं ते आम्हांला कळलं नाही, म्हणून ते पुढं म्हणाले, “अहो मी ८५ वर्षाचा आहे,पण मी ७०चा असल्यापासून काही लोक मला टोमणे मारतात,माझ्या चांगल्या राहणीवर हसतात.”

  “पण तुम्ही लक्ष देवू नका असं आम्ही त्यांना म्हणू शकलो नाही.कारण त्यांना तेवढं नक्कीच कळत होतं.गेली अनेक वर्षे ते त्यांना हसणाऱ्या,टोमणे मारणाऱ्या लोकांकडे दुर्लक्षच तर करत होते.पण तरीही त्यांना नजर खुपत होत्या.त्यांच्या डोळ्यात पाणी आणत होत्या.

   “आपणच आपलं आयुष्य असं वाढवून थोडेच घेत असतो.ते आपल्या हातात कुठे आहे?मी एवढी वर्षे जगलो याला मी जबाबदार कसा?पण मी ठरवलं की जिवंत असे पर्यंत नीट राह्यचं.जमेल तशी मौज करायची”

  लोक काकांच्या  राहणीमानाकडे बघून नाक मुरडतात .म्हातारा अजून कसा टूणटूणीत आहे याचं आश्चर्य व्यक्त करतात.किंवा हे अजून जिवंत आहेत?यांना काहीच कसं होत नाही?या नजरेने लोक त्यांच्याकडे बघतात. तेव्हा काकांना खूप वाईट वाटतं. ते म्हणतात, “जोपर्यंत माणसाची गरज असते,उपयोग असतो तो पर्यंत लोक आपल्याला जिवंत राहण्याची परवानगी देतात.नाहीतर आपण मेलेलं बरं असं त्यांना वाटतं.”

  “अहो, असं नसेल काका” मी म्हटलं.

“असंच आहे,आणि ते मी लोकांच्या नजरेत गेली १५ वर्षे बघत आहे.तुमचा उपयोग संपला,तुम्ही गेलात/मेलात तर उत्तम.पण ते माझ्या हाती नाही,कोणाच्याच हाती नाही.म्हणून मी व्यवस्थित राहतो.पण ते ही इतरांना आवडत नाही.”  

आपण खरंच असा विचार करतो का? माणसाचा उपयोग संपला तर तो या जगातून नाहीसा व्हावा असं आपल्याल खरंच वाटतं का? आपल्या नजरा वृद्ध व्यक्तींशी हे बोलतात का? शोधू या का आपण आपल्या नजरांना? विचारू या का स्वतःला की आपलाही उपयोग कधी ना कधी संपणार आहेच ना? मग काय करणार आहोत आपण? यासाठी बोलायला हवं.संवाद हवाच,कोण चुकीचा किंवा बरोबर असं असण्यापेक्षा आपण आहे ते बोलायला हवं.नाही का? काकांसारखे अनुभव तुम्हांला आले आहेत का? किंवा काकांकडे ज्या नजरेने लोक बघत होते त्या नजरेने तुम्ही कोणाकडे कधी पाहिलं आहे का? बोलू या यावर.ज्याने त्याने आनंदाने जगायचं ठरवलं तर कोणाच्या नजरेची आडकाठी का बाळगायची नाही का?आपल्या हातातला क्षण महत्वाचा आहे.तो मात्र संवादी हवा.

वंचित विकास कार्यालय – 7972086730