‘हे होऊ शकतं’ – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/06/helping-hand-businesmen_89224-924.jpg

‘हे होऊ शकतं’

Posted By :

कोणासाठी काहीतरी  विधायक करत राहणे म्हणजे जीवन होय. असं आपल्यातल्या बहुसंख्य लोकांना वाटत असेल.पण ते प्रत्यक्षात करायचं म्हटलं की अडचणींचा हिमालय ते दुसऱ्या समोर क्षणार्धात उभं करतात. त्यात वेळ नावाची गोष्ट तर कोणाकडेच उपलब्ध नाही,शिवाय पैसा तो तर मुळीच नाही. अशा वेळी आठवण येते ती डोंबिवलीच्या भागवत काकांची. त्यांच्याकडे एवढा वेळ कसा? त्यांचे जीवन सगळे आरामात गेले असेल असे कोणालाही वाटेल.पण तसे नाही. ते ही आपल्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबाचे प्रमुख आहेत. ते हिंदी भाषेचे शिक्षक होते,त्यासाठी ये-जा करत. पण तरीही मनातली दुसऱ्यांना मदत करण्याची आस मात्र कायम जागी होती आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची तीव्र इच्छा होती.म्हणूनच त्यांनी अनेक ठिकाणी फिरून सामाजिक संस्थांना लाखोंची मदत मिळवून दिली. लोकांना सामाजिक कामाचे महत्व पटवून देऊन, संस्थांना पैशांची किती गरज आहे हे समजावून देऊन पैसे मागणे.ही फार धैर्याची आणि समजेची गोष्ट आहे.  

भागवत काका आमच्यासाठी नेहमी उभे राहिले,आमच्या कामांना त्यांनी नेहमीच हातभार लावला. माणूस नोकरीतून निवृत्त झाला की त्याला त्याचे असे अनेक छंद जोपासायचे असतात. ते बरोबरही आहे.नेहमीच्या कामाच्या धावपळीत जे शक्य नाही ते निवृत्तीनंतर करावं वाटणं साहजिकच आहे.पण भागवत काका निवृत्त नोकरीतून झाले पण त्यांचं काम थांबलं नाही तर उलट दुप्पट वेगाने सुरु झालं. मी माझ्या वेळेचे काय करू हा प्रश्न त्यांच्यासमोर कधी येत नाही,उलट त्यांना अजून वेळ हवा असं वाटत असणार. त्यांचा उत्साह, त्यांची देण्याची वृत्ती आणि मदतीचा हात आपण हातात घ्यावा असं नेहमी वाटतं.कारण त्याचमुळे ते गुण आपल्या सगळ्यांमध्ये पाझरत येतील.नाही का?

     भागवत काका म्हणतात सामाजिक कार्यकर्त्याने सेल्समन असलं पाहिजे. त्यांची एक एक वाक्य ऐकत राहावी अशीच तर आहेच,पण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशीही आहे. आज त्यांचे वय ८९ आहे,आणि ते कोणत्याही परिस्थितीत म्हणतात, “असं करता येऊ शकतं” हे वाक्य म्हणजे सकारात्मक भावनेकडे टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. असे चांगले मित्र संस्थेला दोन्ही अर्थाने श्रीमंत करतात.

वंचित विकास कार्यालय – 7972086730