खरा संवाद…. – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/12/sanwand-lekh.jpg

खरा संवाद….

Posted By :

Blog No.4                                                                                                                                            

          “काय झालं सुमती ताई?”

यावर त्यांनी फक्त तोंड फिरवून घेतलं. त्यांच्या मनात काहीतरी बोचत होतं,कशाची तरी त्यांना खंत वाटत होती हे नक्की.पण कशाची हे मात्र कळत नव्हतं.

   सुमती ताईंनी आपलं करियर स्वतःच्या हिंमतीवर घडवलं होतं,असं म्हणण्यापेक्षा आपल्या बुद्धीच्या जोरावर घडवलं होतं असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल.त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती.वेगवेगळे विषय समजून घेणं,त्याबद्दल बोलणं हे त्यांना मनापासून आवडायचं.त्यांनी आपल्या वाचनाच्या आवडीतून अनेक गोष्टी समजून घेतल्या होत्या.त्यावर त्यांना बोलायलाही आवडायचं.त्यांचा एक मस्त मोठा गृप होता.त्यात अशा प्रकारच्या बौद्धिक चर्चा व्हायच्या.कधी कधी वितंडवाद सुद्धा होत असत.

   पण आता त्यांच्या गटातल्या सगळ्यांचीच वयं झाली.कोणी कोणीकडे जाऊ शकत नाही.जिथं मुलं असतील तिथं काहीजण गेले.सुमती ताई सुद्धा आता सत्तरीला आल्या.त्यांना बाहेर जायला जमत नाही.त्यामुळे घरात बसून असतात.

  म्हणून त्यांना आपण टीव्ही बघा,मोबाईल वर किंवा laptop वर काही बघा,ऐका असं म्हटलं तर त्या लगेच म्हणत, “अग एवढी बुद्धी आहे मला.”

  मग नक्की काय हवं आहे तुम्हांला?

घरात कामाला बाई येते ना वेळेवर?

हो.

बिलं वेळेवर भरतो ना मुलगा?

हो.

मग अडचण काय आहे?

माझ्यासारखंच तुम्हांला वाटलं असेल ना?की बाईला सुख दुखतं आहे म्हणून.

खरं आहे आपण आपल्या बाजूनं विचार करत असतो म्हणून नक्की मेख कुठं आहे हे आपल्याला कळत नाही.

“अग! मला कोणाशी तरी बोलावं वाटतं”

कोणाला पाठवू?

अशी व्यक्ती पाठव जी माझ्याशी बौद्धिक गप्पा मारू शकेन.जगातल्या,कानाकोपऱ्यातल्या गप्पा मारेन.नवीन पुस्तकं, तत्वज्ञान,अगदी बुद्ध,कबीर यांच्या तत्वज्ञाना बद्दल बोलली तरी चालेन.

 आत्ता लक्षात आलं,सुमती ताईना त्यांच्या बुद्धीच्या पातळीवर जाऊन गप्पा मारणारं, बोलणारं मैत्र हवं होतं.

आपण  वयस्कर व्यक्तींबद्दल किती चाकोरीबद्ध विचार करत असतो.त्यांचे औषधपाणी,खाणंपिणं आणि त्यांचे रोजचे व्यवहार इतकंच फक्त आपण डोक्यात ठेवतो.एखाद्या व्यक्तीची अशी बौद्धिक उपासमार होत असेल हे आपल्या कसं लक्षात येत नाही. की वय वाढलं म्हणजे त्यांची बुद्धी पण कमी झाली असं आपण गृहित धरतो?

  अर्थात आज सुमती ताई बोलल्या म्हणून आपल्याला कळलं की माणसाला संवादाची आणि तो ही बौद्धिक संवादाची सुद्धा गरज असते.नाहीतर त्यांना कंटाळा येतो. चला मग आपल्याही बुद्धीला धार लावायला घेवू या आणि संवाद साधू या.

वंचित विकास कार्यालय – 7972086730