“एक पाऊल स्वतःकडे” – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/01/कपाळ-माझं-आहे-मी-ठरवेल-लावायची-की-नाही-कुंकू-टिकली.jpg

“एक पाऊल स्वतःकडे”

Posted By :

तिथं जमलेल्या सगळ्याजणींना काही ना काही काम करायचं होतं. व्यवसाय करायचा होता. कोणाला शेळ्या पाळायच्या होत्या, कोणाला शिवण मशीन घ्यायचं होतं,कोणाला कापड दुकान चालवायचं होतं तर कोणाला पापड,शेवया याचं मशीन घ्यायचं होतं.प्रत्येकजण आपल्या मनात एक व्यवसाय ठरवून आली होती.     या सगळ्या ४०-५० शीच्या स्त्रिया होत्या. घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. बऱ्याचजणींचा नवरा गेला होता,तर काहीजणींचे लग्न झाले नव्हते.या सगळ्याजणी घरातले सगळं काम करत होत्या, बाहेरचीही कामं करत होत्या. म्हणून त्यांना म्हटलं, “तुम्ही एवढं सगळं काम करता पण तुम्हांला तुमच्याकडे बघायला अजिबात वेळ नाही.बघा तुम्ही मिटिंगला येतांना सुद्धा अजिबात आवरून आल्या नाहीत.” ही मिटिंग मराठवाड्यातल्या एका छोट्या गावातल्या समाजमंदिरात होती.

“ताई मेकअप केला की लोकं नावं ठेवतात, जरा नीटनेटकं आवरून बाहेर निघालं की, सगळ्यांच्या नजरा आम्हांला विचारतात, कुणीकडे निघालीस? सासूपण येता जाता टोकते. शिवाय आम्ही विधवा आहोत ना? मग टिकली, कुंकू कसं लावणार? सासूला आणि बाकीच्या लोकांना नाही आवडत.”   सगळ्यांनी मिळून मला हे सर्व सांगितलं. “तुम्हांला टिकली लावावी वाटत असेल तर तुम्ही ती लावायला पाहिजे. आपण अगदी लहान असल्यापासून टिकली लावतो. नवरा असण्या नसण्याशी त्याचा काही सबंध नाही.”

  यावर कोणीच काही बोललं नाही. मग आमची एक कार्यकर्ती म्हणाली, “माझ्याजवळ टिकली आहे, चला कोणाकोणाला लावावी वाटते त्यांनी ती घेवून लावा.”

 तरीही कोणीच पुढे यायला तयार नाही. मग तीच पुढे म्हणाली, “तुम्हांला व्यवसायासाठी पैसे हवे आहेत ना? मग ज्याला टिकली लावावी वाटते, चांगलं राहावं वाटतं त्याने टिकली लावली तरच पैसे मिळणार नाही तर नाही.”

     मध्ये बराच वेळ गेला,आणि सरिता उठून उभी राहिली. “ताई मला द्या टिकली, मी रोज लावेन.”

  तिचं बघून बाकीच्याजणी एकमेकीच्या मदतीने पुढे पाऊल टाकू लागल्या. खरंतर त्यांना व्यवसायासाठी मदत हवी होती, म्हणून त्या हे धाडस करायला निघाल्या होत्या.

  या विधवा मुली सासरी राहतात, घरातली सगळी कामं करतात. पण त्यांना नीटनेटकं रहावं वाटलं तर मात्र विरोध होतो. कारण काय तर ती बाहेर जाऊन हुशार होणार, तिला अधिक कळणार, पैशाचे व्यवहार करणार. कदाचित दुसरं लग्न सुद्धा करणार. मग घरातली मान खाली घालून सतत काम करणारं माणूस जाईल. म्हणून तिच्या रहाणीमानावर अनेक बंधनं आहेत. आजही अशी परिस्थिती आहे. शहरातील काही स्त्रियांना त्यांना आवडेल तसं राहण्याची सवलत कोणत्या ना कोणत्या कारणाने मिळाली आहे किंवा काहींनी घेतली आहे. पण खेड्यात अजूनही आजूबाजूचे लोक काय म्हणतात? याला फार महत्व आहे. काहीवेळेस तिची मुलं सुद्धा तिच्या बाजूने नसतात. अशावेळी ही स्त्री एकटी पडते. तिच्या छोट्या मोठ्या कामावरच खरं तर घर चालत असते. पण तिच्या मनाचा मात्र कोणी विचार करत नाही.

         या स्त्रियांनी हे धाडस आज घरचा कारभार नीट चालावा म्हणून केलं असलं तरी, हेच धाडस त्यांचे स्वतःकडे व्यक्ती म्हणून बघण्याचे पहिले पाऊल असेल असं वाटतं. अर्थात त्यासाठी त्यांच्याशी सतत संवाद ठेवायला हवा. हे मात्र नक्की.

वंचित विकास कार्यालय – 7972086730