‘अभया’ माझी मैत्रीण – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/05/sammmm.jpg

‘अभया’ माझी मैत्रीण

Posted By :

‘मला वैधव्य आलं,पण तेव्हा नोकरी करत होते, त्यामुळे काही जाणवलं नाही,माझा मुलगा,सून दोघंही चांगले आहेत.पण कामाच्या निमित्ताने त्यांना उपनगरात रहावं लागतं,म्हणून त्यांच्याशी रोज भेट होत नाही. त्यामळे मला फार एकटं वाटतं,भावनिकदृष्ट्या तर खूपच एकटं वाटतं.”

     ‘मला शिवणकाम, भरतकाम, वीणकाम, यांची आवड आहे, मी करतेही छान. पण माझा नवरा,सासू यांना अशा कलात्मक कामाची आवड नाही. मी केलेल्या वस्तुंचं कधी कौतुक करत नाहीत, त्यामुळे माझा त्यांच्याशी संवादच होऊ शकत नाही. ‘पहिल्यापासून आम्ही दोघंच घरात! नोकरीतून रिटार्यड झालो, उभा दिवस ‘आ’ वासून समोर! दिवसभरात आमच्या दोघांमध्ये दोन-तीन वाक्यांची देवाण-घेवाण,मनातलं काहीच बोलता येत नाही. मनातलं खूप सांगावसं वाटतं,कोणाला सांगू?      ‘लग्न केलं नाही, कारण मनासारखा कोणी जोडीदार भेटलाच नाही. सतत कामात गुंतून घेतलं होतं. आत्ता या वयात मात्र एकटेपण जाणवतं. काही नाजूक विषयांवरही बोलावं वाटतं,कोणापुढे मन मोकळं करू?

हा एकटेपणा,तुटलेपण हे सगळंच खूप भयंकर आहे, विशेषतः मनमोकळं करून भावनांचा निचरा व्हायलाच हवा. यासाठीच ‘अभया’ गट आहे. नव्या मैत्रिणी मिळणं, आधीच्या आयुष्यात राहून गेलेल्या कविता म्हणणं,गाणं म्हणणं,खूप भटकणं,मोबाईलची बॅटरी उतरेपर्यंत मैत्रिणींशी भरभरून गप्पा मारणं हे करायचं आहे ना! पुन्हा एकदा तरुण व्हायचं ना! एकटेपणाची कोंडी फोडून, मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘अभया’गट आहे.

   मैत्रिणींनो अभया गटात यायला वयाचं बंधन नाही, कारण चारचौघात राहून एकटं वाटणं अशी भावना कोणत्याही वयात येवू शकते. कारण आवडी-निवडी विचार भिन्न असतात. आपल्या आसपासच वातावरण नेहमी आपण व्यक्त व्हावं असं नसतं,म्हणून ‘अभया’त स्वतःला व्यक्त करा.क्या असतं की नोकऱ्या देणाऱ्या,काम देणाऱ्या वेगळ्या संस्था आहेतच,पण आपली भावनिक कोंडी दूर करणारं कोणी आहे का? नाही ना? मग ‘अभया’त नव्या मैत्रिणी मिळतील, सक्रिय सहभाग घेऊन नवे उप्रकमही करता येतील, आपल्यातले नेतृत्व गुण दाखवायला वाव मिळेल.

वंचित विकास कार्यालय – 7972086730