यशस्विनी -९ (अ)/बालिका
बालिका असे सांगते,”मी ७ वी वर्ग पास झाले होते. पण मला साधी आडवी रेघ देखील ओढता येत नव्हती.वंचित विकासच्या सबला महिला केंद्रामुळे माझा विकास झाला. आज मी विमा एजंट आहे.”
एवढा बदल झालेल्या बालिकाचे सुरुवातीचे आयुष्य फारच बिकट होते. तिचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षीच झाले. दोनच वर्षे ती सासरी राहिली. नंतर ती माहेरी परत आली. आपल्या मनाविरुद्ध लग्न झाले असे नवऱ्याचे म्हणणे! त्यामुळे तो तिला सारखी मारहाण करायचा. संशय घ्यायचा. खरे तर नवऱ्याचेच बाहेर संबंध होते याची तिला खात्री होती. पण ती बोलणार कशी? आणि बोलली तरी तिचे कोण ऐकणार? शेवटी कंटाळून ती माहेरी निघून आली.
रंजनाताई व ताराताईंकडून तिला सबला महिला केंद्राची माहिती मिळाली. घरातून विरोध नव्हता. ती केंद्रात शिकायला आली. स्वावलंबी बनण्याचा तिने निश्चय केला. कधीही घराबाहेर न पडलेली बालिका शिक्षणानंतर लातूरमध्येच रूम करून राहिली. एका रुग्णालयात ती काम करू लागली. त्यानंतर ती गावी गेली. तिने शिवणकाम सुरु केले.
शिवणकाम करायचे, शेतात मजूरी करायची असे करत करत तिने पैसे मिळवले. दुसरीकडे घटस्फोटही मिळवला. हळूहळू इतरांशी बोलण्यात ती तरबेज झाली. त्यामुळे ती विमा एजंट बनली. त्यातून तिला महिना हजार पंधराशे रुपये मानधन मिळते. तिने लाखभर रुपयांची बचत केलेली आहे. विमा पॉलिसी काढलेली आहे. पोस्टात रिकरींग पण सुरु केलेले आहे.
आपण स्वतंत्रच रहावे अशी तिची इच्छा आहे. तिच्यासारख्या गरीब, फसलेल्या, अन्याय झालेल्या बायांना मदत करण्याची व त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची तिची इच्छा आहे. तिचे भाऊ तिच्या आई वडिलांना सांभाळत नाहीत. त्यांना मदत करीत नाहीत. आता आई वडिलांना कायमस्वरूपी सांभाळून तीच त्यांचा आधार बनणार आहे. आई वडिलांना सुखी करण्याचे तिचे स्वप्न आहे.
——————————————————————————————————————–