यशस्विनी – ८ / मेहबूबा
लग्नाच्या वेळी मेहबूबा १२ वर्षांची होती. काय कळते या वयात? पण लग्न केले गेले. संसाराचा गाडा ओढावा लागला. हा संसार म्हणजे फक्त यातनाच असतात, असे तिला वाटू लागले. नवरा बाहेरख्याली होता. तो तिला सारखी मारहाण करायचा. बायकोला मारायला कारण लागत नाही. आपल्याकडे हे असेच चालते. हिंदू असो की मुस्लीम, धर्म कोणताही असला तरी नवरे आपल्या बायकांशी असेच वागतात. तशातच मेहबूबाला दोन मुले झाली. सासूही तिला सारखा त्रास दयायची. नवऱ्याच्या आणि सासूच्या त्रासाला कंटाळून अखेर १० वर्षांनी मेहबूबा माहेरी परत आली.
मेहबूबा ही मुस्लीम युवती. गोशातून कधीही बाहेर पडलेलीच नव्हती. स्वतःच्या मोहल्ल्यावाचून बाहेरची कोणतीही माहिती नाही. बाहेर पडले तर आपले कसे होईल अशी तिला सतत भीती वाटत असे. अशातच वंचित विकासच्या सबला महिला केंद्र, लातूर शाखे मधून शिकून बाहेर पडलेल्या एका मुली कडून केंद्राची माहिती मिळाली. तिने केंद्रात शिकायला जायचे ठरवले. वडिलांनी विरोध केला. तरी स्वतःच निर्णय घेऊन ती केंद्रात दाखल झाली. केंद्रातील शिक्षण, वातावरण आणि सर व संध्याताईंचे मार्गदर्शन यामुळे तिच्यात भराभर बदल होऊ लागला. केंद्रातील शिक्षण पूर्ण करून ती माहेरी गेली. कपडे शिवू लागली. पैसे कमवू लागली.
मेहबूबा मधील हा बदल तिच्या नवऱ्याच्या कानावर गेला. तोपर्यंत कोर्टात केस सुरु झालेली होती. नवऱ्याने कोर्टात मी बायकोला नांदवेन असे सांगितले. त्याप्रमाणे तो तिला न्यायला आला. मेहबूबा स्वतःच्या अटीवर नवऱ्याकडे जायला तयार झाली. आपल्यावर कोणाकडूनही अन्याय झाला तर त्याला तोंड दयायला ती खंबीर झालेली होती. तिने सासूपासून वेगळे राहण्याची अट घातलेली होती. नवऱ्यानेपण ती अट मान्य केली. तिच्या वकीलांनी तिला सांगितले की तू सासरी जाऊ नकोस. त्यावर ती वकिलांना म्हणाली,”काय होणार आहे? जे काही होईल त्याला तोंड देण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे.” वकीलांनी विचारले, एवढे धाडस तुझ्यामध्ये कोठून आले? तिने तडफदारपणे उत्तर दिले, “सबला महिला केंद्रामधून.” वकिलांना फार आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “मुळूमुळू रडणारी मेहबूबा आता खरेच झाशीची राणी झालेली आहे.”
नवऱ्याला घेऊन आता ती स्वतंत्र रहाते. मुलेही जवळ आहेत. नवरा साखरकाखान्यात नोकरीला आहे. ती शिवणकाम करते. दिवसाला दीड-दोनशे रुपये कमावते. साईबाबा बचत गटाची ती सदस्य आहे. त्या मार्फत बचत करते. पोस्टातील पुनरावर्ती ठेव योजनेमध्येही पैसे गुंतवते.
तिच्याप्रमाणेच अडचणीत असलेल्या महिलांना ती मदत करते. भांडणे सोडवते. इतर लोक तिचे ऐकतात, तिच्या शब्दाला मान देतात.
तिला स्वतःचा बंगला बांधायचा आहे. मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे. जन्माला आल्यासारखे काहीतरी करून दाखवावे अशी तिची इच्छा आहे. ती म्हणते,”सबला महिला केंद्रामुळे मी घडले. पितळी भांडयाला गरम करून झाळल्यावर जशी लकाकी येते तसे माझे आयुष्य झळाळून निघाले आहे.”
—————————————————————————————————————–