यशस्विनी – ६ / कमल – Vanchit Vikas

यशस्विनी – ६ / कमल

Posted By :

 

कमल १४ वर्षांची असतानाच तिचे लग्न करण्यात आले. तिचे ६ वी पर्यंत शिक्षण झाले होते. पण लिहिणे-वाचणे विसरायला झाले होते. सासरी ती जेमतेम महिनाभरच राहिली होती. कमल नाकी डोळी नीटस होती. नवरा तिच्यापेक्षा वयाने दुपटीने मोठा होता. तो सारखे  तिच्याशी  संशयाने  वागायचा . सतत त्याची बोलणी ऐकून आणि मार खाऊन ती वैतागली. माहेरी निघून आली.

माहेरी राहून असेच फुकट आयुष्य वाया चालले होते. घरकाम करायचे आणि गपगुमान बसायचे असे किती वर्षे चालणार होते? ती कंटाळली. वैतागली. वंचित विकास मध्ये शिकून गेलेल्या एका महिलेकडून तिला केंद्राची माहिती मिळाली. तिने लातूरच्या केंद्रात येण्याचा निश्चय केला.

केंद्रात आल्यावर हळूहळू ती पार बदलून गेली. ती त्या अनुभवाबद्दल म्हणते,”चांगल्या लोकांचा सहवास मिळाला. स्वतःचे निर्णय स्वतः कसे घ्यावेत ते समजले. सरांचे आणि संध्याताईंचे मार्गदर्शन मिळाले आणि मी पार बदलून गेले.” फार थोडयाकाळात ती उत्तम शिवणकाम शिकली.

शिकून गेल्यावर ती आई वडिलांकडे गेली. पण भाऊ म्हणाला,”आमचा विरोध असताना तू केंद्रात गेलीस. आता आमच्या घरात रहायचे नाही.” भावापुढे आई वडिलांचे काही चालले नाही. तिने आपली पिशवी उचलली आणि घराबाहेर पडली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या तालुक्याच्या ठिकाणी आली. तेथे तिने किरायाने जागा घेतली. स्वतःची मशीन तेथे ठेवली आणि तेथेच राहू लागली.

या तालुक्याच्या ठिकाणी एकटी तरुण स्त्री डगमगली नाही. घाबरली नाही. रडत बसली नाही. पुण्यामुंबई सारख्या शहरात सुद्धा एकटया महिलेला राहणे कठीण जाते. ही तर परित्यक्ता. कळंब सारख्या गावात कोणाचा आधार नसताना रहाणे अवघड असते. अशा बाईकडे अनेक पुरुष वाईट नजरेने पाहतात. स्वतःची मालमत्ता समजतात. पण कमल खंबीरपणे एकटी राहिली. ती नम्रपणे बोले. आपुलकीने तिने माणसे जोडली.

दिवसाचे १४-१४ तास ती कपडे शिवत बसे. तिच्याकडे बाया बापड्या कपडे शिवून घ्यायला येत. गावातील इतर शिंपी व्यावसायिकांशी स्पर्धा असूनसुद्धा तिच्याकडे कामाला तोटा नव्हता. हा तिच्या माणसे जोडण्याच्या स्वभावाचा परिणाम. ज्या कळंब मध्ये तिने किरायाने जागा घेतली, त्याच गावात तिने प्लॉट घेतला. सुमारे दोन लाख रुपये खर्च करून संडास बाथरूमसह छोटासा बंगला बांधला.  हे सर्व पैसे तिने शिवणकाम करून मिळविलेले होते.

 

आज कमलला समाजात मान आहे. तिला कोणाच्या आधाराची गरज वाटत नाही. ताठ मानेनेच ती जगली.  सासर सुटले तसे माहेरची दारेही बंद झालेली आहेत. ती माहेरीही जात नाही. मात्र माहेरच्यांना स्वतःच्या घरी बोलवायला ती चुकत नाही. अधून मधून तिची आई तिच्यापाशी येऊन राहते.

 

आपल्यासारख्या  अडचणीत सापडलेल्या बायांना ती मदत करते. त्यांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न करते. एखादे मूल दत्तक घ्यावे अन त्याला वाढवावे एवढीच तिची इच्छा आहे. कदाचित तिची ही इच्छा देखील पूर्ण होईल.