यशस्विनी – १६ (ब) / नंदा
गावात दारूबंदी करणारी धाडसी महिला असा जिचा गौरव केला जातो ती ही नंदा. लातूर जिल्हयातील मुसळेवाडीची. शिक्षण जेमतेम ४थी पर्यंत झाले होते. वयाच्या १३व्या वर्षीच तिचे लग्न झाले होते. दीडच वर्षे ती सासरी राहिली. गरोदर असताना ती माहेरी आली आणि परत सासरी गेलीच नाही.
नवरा दारुडा होता. दारू पिऊन मारहाण करायचा. तिला दिवसभर खोलीत कोंडून ठेवत असे. रात्री घरी येऊन त्रास द्यायचा. त्याचे पहिले लग्न झालेले होते. त्याला दोन मुलेपण होती.
पुढे नंदा बाळंत झाली. तिला मुलगा झाला. काही काळ ती घरीच बसून होती. संगीताताई कडून तिला वंचित विकासच्या लातूर येथील सबला महिला केंद्राची माहिती मिळाली. तिने केंद्रात शिकायला जायचे ठरवले. घरच्यांचा पाठिंबा होता.
शिकून आल्यावर ती शिवणकाम करायला लागली. पैसे कमवायला लागली. शिक्षणामुळे तिच्या मध्ये आत्मविश्वास आलेला होता. धाडस आलेले होते. ती विचार करायला लागली, आपली अशी अवस्था का झाली तर नवऱ्याच्या दारू पिण्यामुळे. ती इतर घरांमध्ये पण पहात होती, सगळीकडे हेच चित्र होते. ती बायकांशी बोलायला लागली, त्यांना एकत्र करायला लागली. ती सगळ्यांना समजावून सांगायला लागली, दारू वाईट आहे. दारूमुळे संसाराची वाताहात होते. हे ती समजावून सांगायला लागली. सर्वांना हे समजत होतेच पण कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज होती. तो पुढाकार नंदाने घेतला आणि दारुबंदीचे आंदोलन सुरु झाले. हे आंदोलन शांतपणे चालू होते. पुरुषांनी खूप अडथळे आणले. पण गावात दारूबंदी झालीच. नंदाला आता गावात मान मिळू लागला. नंदा खरेच धाडसी होती. गावात सुधारणा घडवून आणण्याचा नंदाने विडाच उचलला होता. तिचे हे काम आजही चालूच आहे.
नंदाला स्वतःचे घर बांधायचे आहे. मुलाला शिकवून नोकरीस लावायचे आहे. तिची ही स्वप्ने स्वतःपुरती आहेत. पण वंचित विकास संस्था ज्याप्रमाणे इतरांसाठी काम करते तसेच तिला इतरांसाठी काम करायचे आहे. “संस्थेने मला दिलेली शिदोरी त्यासाठी पुरेशी आहे” असे ती म्हणते.