यशस्विनी – १५ (अ)/वसुधा
वसुधा फक्त ५ वी पर्यंत शिकलेली होती. नंतर ती लिहिणे-वाचणेही विसरलेली होती. पण नंतर तिने सांगितले, “सबला महिला केंद्रात शिकायला आल्यापासून माझ्या मध्ये वाचनाची आवड निर्माण झाली. जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा मी पुस्तक वाचत बसते.”
वसुधाचे लग्न वयाच्या १५ व्या वर्षी झाले. सासरी ती फक्त दीड वर्षे राहिली. सलग सासरी राहण्याचा काळ हा एवढाच. बाकी सतत जाणे-येणे हेच चालू होते. यातच तिला एक मुलगा झाला. बराच काळ ती माहेरीच असते. याची करणे दोन. एक – नवरा दारू पिऊन मारहाण करतो. दोन – सासऱ्याची तिच्याकडे बघण्याची नजर वाईट आहे. त्यामुळे माहेरी आलेल्या वसुधाला आपल्या भवितव्याची चिंता वाटायला लागली.
अशातच लातूरच्या सबला महिला केंद्रात शिकून गेलेल्या महिलेकडून तिला केंद्राची माहिती समजली. तेथे जाण्यास तिच्या आई वडिलांचा विरोधच होता. तरीही ती केंद्रात शिकायला आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर वसुधाने शिवणकाम सुरु केले. तसेच कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसायही सुरु केला. कमावलेल्या पैशातून तिने एक म्हैस आणि तीन शेळ्या खरेदी केल्या. ती आयुर्विमा आणि बँकेत बचत करते.
शिकून आल्यानंतर सासरच्यांनी तिला सासरी येण्याचा आग्रह केला. पण तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. ती मुलाला घेऊन माहेरीच राहिली. परंतू तिने सासरशी संबंध तोडून टाकलेले नाहीत.
मुलाला चांगले शिक्षण देऊन त्याला नोकरी लावून दयायची इतकेच तिचे स्वप्न आहे. अडचणीत सापडलेल्या स्त्रियांना ती मदत करतेच.
अतिशय कृतज्ञतेने ती सांगते,”सबला महिला केंद्रात आलेल्या प्रत्येक महिलेचे पुनर्वसन झालेले आहे.”
—————————————————————————————————————–