यशस्विनी ९ (ब ) / हसीना
“घरात जे शिक्षण मला मिळाले नाही ते लातूरच्या संस्थेत मिळाले.” असे अभिमानाने सांगणारी हसीना खरे तर केंद्रात येण्यास मुळीच तयार नव्हती.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या गावात राहणाऱ्या हसीनाचे लग्न तेराव्या वर्षी झाले. सासरी ती ६ वर्षे राहिली. पण नवरा दारुडा होता. तो हसीनाला रोज मारहाण करीत असे. त्याचे दुसऱ्या बाईशी संबंध होते.यास कंटाळून ती आपल्या मुलाला आणि मुलीला घेऊन माहेरी आली.
लातूरच्या सबला महिला केंद्राची माहिती रंजनाताईंकडून हसीनाला मिळाली. घरातील कोणाचा केंद्रात जायला विरोध नव्हता. पण तिचीच इच्छा नव्हती. एकदा रंजनाताई तिला न्यायला आल्या तेंव्हा ती शेजारच्या शेतात पळून गेली. रंजनाताई निराश होऊन परतल्या. पुढे ती आपण होऊनच केंद्रात शिकायला आली.
ती इ.६ वी पर्यंत शिकलेली होती. पण लिहायला वाचायला तिला येत नव्हते. केंद्रातच ती साक्षर झाली. पुढे केंद्रातून परतल्यानंतर तिने इ. ७ वी ची परीक्षा दिली. ती परीक्षा उत्तीर्ण झाली. नंतर ती अंबेजोगाई येथे गेली. तेथे एम.आय.टी संस्थेच्या बालगृहात गृहमाता म्हणून एक वर्षे तिने नोकरी केली. त्या नंतर ती माहेरी परतली. आता तिने माहेरच्या जवळच खोली घेतलेली आहे आणि मुलांना घेऊन ती स्वतंत्र राहते. शिवणकाम करते आणि कुरडया पापडया विकण्याचा व्यवसाय पण ती करते. शेतामध्ये मजूरी करण्याचा तिला तिटकारा आहे. आता तिला शेतात काम करण्याची गरजही वाटत नाही.
ती सासरी गेली नाही. सासरच्यांनीही तिला बोलावले नाही. नवरा मात्र आपणहून तिच्याकडे आला. तिच्याच खोलीत रहायला लागला. दोन महिने व्यवस्थित वागला. पण पुन्हा मारहाण करायला लागला. मग मात्र तिने त्याला हाकलून दिले.
मुलांना चांगले शिकवून त्यांना त्यांच्या पायावर तिला उभे करायचे आहे. स्वतःचे घर बांधायचे आहे. ही तिची स्वप्ने आहेत. अडचणीत सापडलेल्या बायकांना पुढील काळात सातत्याने मदत करण्याचे तिने ठरविले आहे.
—————————————————————————————————————–