यशस्विनी – ५ / बीना – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/thumbnail-img.jpg

यशस्विनी – ५ / बीना

Posted By :

 

बीनाचे लग्न वयाच्या सतराव्या वर्षी झाले. कोणाही तरुण मुलीची संसाराबाबत असतात तशी तिचीही स्वप्ने होती. दारू पिणाऱ्या नवऱ्यामुळे लवकरच तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. बीना वयाच्या मानाने जास्त विचार करणारी व गंभीर स्वभावाची आहे. तिच्या हे लक्षात आले की तिच्या नवऱ्याला तिची आणि मुलांची काहीच काळजी नाही. त्याला दिवसरात्र चिंता फक्त दारू मिळविण्याचीच. भवितव्याचा विचार करून आणि भावाच्या संमतीने तिने नवऱ्यास ५ वर्षातच सोडले आणि ती माहेरी येऊन राहिली. लातूर जिल्ह्यातील पानगावला तिचे माहेर आहे.

 

सासर तर सोडले. मग पुढे काय करायचे? सगळीकडे अंधार दाटून राहिला होता. अशात एका सरकारी दवाखान्यातील एका नर्सने तिला वंचित विकासच्या केंद्राची माहिती दिली. बीना केंद्र पाहून गेली. पण प्रश्न होता मुलांचा. पाच वर्षाच्या आतील एका मुलास घेऊन तिला केंद्रात राहण्याची परवानगी होती. पण दुसरे मूल कोण सांभाळणार? आई नाही म्हणाली. बहिणीने ही नकार दिला. पण तिच्या सावत्र भावाने मात्र मुलाला सांभाळण्याची तयारी दाखविली. मग वंचित विकासची कार्यकर्ती ताराताईच्या मदतीने ती लातूर केंद्रात दाखल  झाली.

 

केंद्रातील शिक्षण झाल्यावर सहा महिने तिने शिवणकाम केले. नंतर ती दोन्ही मुलांना घेऊन ‘आपल घर’ मध्ये राहिली. काम केले. मुलांकडे लक्ष द्यायला थोडाफार वेळ मिळत होता. त्याचा तिने पुरेपूर उपयोग करून घेतला. ती अतिशय जिद्दी होती. ती म्हणते,”केंद्रात एक होता कार्व्हर ही गोष्ट ऐकलेली होती. त्याचा माझ्यावर परिणाम झाला. जिद्दी माणूस कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो.” या जिद्दीच्याच जोरावर तिने मुलांना शिक्षण द्यायला सुरुवात केली.

 

पुढे तिला एस.ओ.एस. च्या बालग्राम मध्ये काम करायची संधी मिळाली. मात्र त्यासाठी तिला आपल्या मुलांना दूर ठेवावे लागले. सध्या ती  एस.ओ.एस. च्या अलिबाग केंद्रात काम करीत आहे.

 

तिने बऱ्यापैकी बचत केलेली आहे. पण सारी बचत मुलांच्या शिक्षणासाठी खर्च झाली. मुले शिकली. त्यामुळे आता तिच्याजवळ शिल्लक रक्कम नसली तरीही तिला त्याचे फारसे दुःख नाही. आता मुलांना, माहेरच्यांना तिचे कौतुकही वाटते आणि तिच्याबद्दल आदरही वाटतो. सासरच्यांना तर ती पार विसरून गेलेली आहे.

 

अडचणीत असलेल्या तिच्यासारख्या महिलांना ती जमेल ती आर्थिक मदत तर करतेच पण मुख्य म्हणजे त्यांना भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते,”सर,संध्याताई व ताराताई यांच्यामुळे मी निर्भीड जीवन जगत आहे. त्यांच्यासारखेच गरजू महिलांचा विकास करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.”

 

—————————————————————————————————————————————————–