यशस्विनी – १६ (अ)/प्रतिभा
प्रतिभा उस्मानाबाद जिल्ह्यातील बोरगावची. ती १२ वर्षांची असतानाच तिचे लग्न झाले.ती ३ वर्षे सासरी राहिली. तिला एक मुलगी झाली. पण नवरा तिला उगीचच मारहाण करीत असे. त्याचे भावजयीशी संबंध होते. या त्रासाला ती कंटाळली होती. म्हणून बाळंतपणासाठी माहेरी आली मग परत सासरी गेलीच नाही.
केंद्रात शिक्षण घेऊन गेलेल्या एका महिलेकडून तिला लातूरच्या सबला महिला केंद्राची माहिती समजली. भावाला घेऊन ती लातूरचे केंद्र पहायला गेली. तिला तेथील वातावरण आवडले. वडिलांचा केंद्रात शिकायला येण्यास विरोध होता तरीही ती केंद्रात शिकायला आली. केंद्रात आल्यानंतर तिचे सारे जीवनच बदलले. प्रशिक्षण झाल्यानंतर तिने वंचित विकासच्या लातूर येथील सबला महिला केंद्रात ४ वर्षे काम केले. काही काळ संस्थेच्या इतरही केंद्रात तिने काम केले. याच काळात ९ वी नंतर शिक्षण सोडलेल्या प्रतिभाने आपले बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याच काळात भावाचेही शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी आवश्यक तो खर्च तिने केला. आता तिच्या भावाला शिक्षकाची नोकरी लागलेली आहे.
वंचित विकास मधील कामानंतर प्रतिभाने लातूरमधील नारी प्रबोधन मंच या संस्थेत काम केले. पैसे कमवत असताना तिने स्वतःचे शिक्षण आणि भावाचे शिक्षण पूर्ण केल्यामुळे तिला समाजात आणि गावात प्रतिष्ठा मिळालेली आहे. सासरे तिला नेण्यासाठी आलेले होते पण ती सासरी गेली नाही. नवऱ्यावर तिने कोर्टात भांडण लावलेले आहे. पण अनेक वर्षे झाली तरी निकाल काही लागत नाही.
वंचित विकासच्या सबला महिला केंद्रात जे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे तिच्या जीवनाची नवीन वाटचाल सुरू झालेली आहे असे तिला वाटते.
तिचे एकच स्वप्न आहे, मुलीला खूप शिकवायचे आहे, तिला मोठे अधिकारी बनवायचे आहे. प्रतिभासारख्या अनेक महिलांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्यांची जाण ठेऊन आपल्या मुलीने सुद्धा पुढील काळात महिलांच्या अडचणी सोडवाव्यात असे तिला वाटते.