देवत्व नको, फक्त माणूस म्हणून सन्मानाने जगू दे…
नुकताच संस्थेत तीळगूळ समारंभ वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. या समारंभाला वीरमाता व वीरपत्नी यांना खास पाहुण्या म्हणून बोलावले होते. त्यांच्या नशिबी वैधव्य आले म्हणून त्यांना हळदी- कुंकू समारंभला जात बोलवले नाही, असा उल्लेख झाला आणि मग उद्विग्न झाले.
आज आपण सुधारणांचे डंके वाजवतो, सुधारणेविषयी मोठमोठ्या गप्पा मारतो आणि आपण सुधारक आहोत असा आभास किंबहुना दंभ पसरविला जातो आणि हे सर्रास दिसते. अगदी तथाकथित सुशिक्षित वर्गातही. बाहेर वागायचा देखावा वेगळा आणि प्रत्यक्ष वेगळे वागायचे! केवढा हा विरोधाभास! अर्थात इथेही या नियमाला अपवाद आहेत. त्यांना मानाने वागवले जाते, नाही असे नाही. पण तुरळक.
ह्या निमित्ताने असे म्हणावेसे वाटले की, स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत. नवरा नसणे यामध्ये बाईचा काही दोष नाही व बायको नसणे यामध्ये पुरुषाचाही काही दोष नाही. बायको आहे की नाही हे पुरुषाला कोणी विचारत नाही व बायको नही म्हणून त्याला धार्मिक कार्यक्रमात डावललेही जात नाही. पण कुमारिका, परित्यक्त्या स्त्रिया व विधवा यांना मात्र या धार्मिक कार्यक्रमात आजही डावलले जाते. हे कशासाठी? त्यांचा काय दोष आहे? इतकेच नाहीतर जा स्त्रीला मुलगा नाही तिलाही जाणून-बुजून मागे ठेवले जाते. या विज्ञानाच्या युगात मुलीचा गर्भ आहे असे समजले तर तिला गर्भाशयातच मारण्याचा विचार केला जातो.
मुलीशिवाय किंवा स्त्रीशिवाय जग चालणार आहे का? आजही विसाव्या शतकात फक्त मुली असणाऱ्यांना समाजाने स्वीकारण्यासाठी अनेक जाहीर प्रबोधनपर कार्यक्रम घ्यावे लागतात. एकीकडे स्त्रीला देवता, लक्ष्मी, सरस्वती म्हणायचे व एकीकडे लाथ मारायची व सामाजिक उतरंडीमध्ये बाजूला टाकून, टाळून तिचा चारचौघात अपमान करायचा हा मानसिक, भावनिक अत्याचार नाही का?
मध्यंतरी आमच्या संस्थेत एक केस आली होती. व्यसनी नवऱ्याने घराबाहेर हाकलून देऊन 14 वर्षे झाली. ती बाई धडपडत आपल्या पायावर उभी राहिली. तिला हाकलून दिल्यावर त्या माणसाने दोन बायका ठेवल्या. तो नवरा गेल्यावर सासरच्यांनी बळजबरीने अत्यंत अपमानकारक पद्धतीने तिला विधवा करण्याचा प्रयत्न केला. याचा तिच्या मनावर आघात झाला. पुन्हा ती मानसिकदृष्ट्या खचली. याला जबाबदार कोण?
हे असं वागायला कोणतेही तर्कशुद्ध कारण नाही. स्त्रियांनी खंबीरपणे उभे राहून प्रत्येक क्षेत्रात पराक्रम गाजविल्याची अनेक उदाहरणे संपूर्ण जगामध्ये आहेत. तरी वर्षानुवर्षे रूढी-परंपरा म्हणून आपण असेच वागणार आहोत का? माणूस म्हणून काही विचारत करणार नाही का? आता आधुनिकतेचा बुरखा फाडून कृती करण्याची वेळ आली आहे. स्त्री व पुरुष समान मानुयात आणि स्त्रियांमध्येही सगळ्या स्त्रियांना समान मानून सन्मान देऊ या.