६ डिसेंबर १९९२ ला अयोध्येतील बाबरी मशीद पार उध्वस्त झाली आणि सारा देश सुन्न झाला. पंतप्रधान सुन्न झाले व क्षुब्धही झाले. साऱ्या राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देखील सुन्न झाले. हे असं काही होईल याची कोणीच कल्पना केलेली नव्हती. सर्वसामान्य माणसांना देखील काय बोलावं कळत नव्हतं. आम हिंदू जनतेला देखील काय बोलावं ते समजत नव्हतं. झाल्या घटनेनं हिंदूंना देखील आनंद नाही वाटला. उलट मनात कुठे तरी अपराधीपणाची बोच बोचू लागली. मशिदी उध्वस्त करणं ही या देशाची परंपरा नाही. तुम्हीही नांदा, आम्हीही नांदतो, अशी समंजस संस्कृती आहे या देशाची. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद यांच्या नेत्यांचीही पहिली प्रतिक्रिया सुन्नतेची होती. एक प्रकारच्या अपराधीपणाची भावना त्यांच्याही मनात होती. काही क्षणांनंतर मात्र ही भावना गेली. काही नेत्यांनी ‘हिंदूंवरील अन्यायाचा स्वाभाविक उद्रेक‘ म्हणून मग प्रतिक्रिया व्यक्त केली. काही नेत्यांनी, शिवसेनेनी, बजरंग दलानी मात्र याचा आनंदच व्यक्त केला. हिंदुत्ववादी नेत्यांमधील मवाळ स्वत:ला या घटनेबद्दल दोषी समजू लागले तर जहाल नेते हे असंच व्हायला हवं होतं, असं म्हणू लागले..
ही सारी घटना घडली कशी? ती टाळता आली नसती का? की, ती काहींना टाळायचीच नव्हती?