‘निर्भीडपणे जगणाऱ्या स्त्रियांच्या जिद्दीला सलाम !’ – महाराष्ट्र टाईम्स
स्त्री नेहमी कुटुंबाचा विचार आधी करते. तिच्यात कष्ट करण्याची, संघर्ष करण्याची, तडजोड करण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन नेटाने पुढे जाण्याची क्षमता असते. परिस्थितीवर मात करून निर्भीडपणे उभ्या राहणाऱ्या अशा स्त्रियांच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी केले.
वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे देण्यात येणाऱ्या ‘अभया पुरस्कार’वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.पुरस्काराचे चौथे वर्ष होते.’निर्मळ रानवारा’च्या संपादिका ज्योती जोशी, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर,अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा,संचालिका सुनीता जोगळेकर,मीना कुर्लेकर,मधुसूदन घाणेकर या वेळी उपस्थित होते. स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विशाखा,tractor चालक,शेती आणि ग्लास पेंटिंगमध्ये निपुण इंदिरा भिलारे, ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण व पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील सुनीता गायकवाड, मराठी संस्कृतीशी एकरूप झालेली जेनी लामा,रुग्णांसाठी घरपोच सेवा देणाऱ्या छाया नागोशी, यांच्यासह सुरेखा पळसकर,ज्योती सपकाळ,मनीषा शिंदे, डॉ.नीलम ताटके आणि विमल वाणी यांना अभया पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. सुतारदरा येथे समाजकार्य करणाऱ्या उषा उपाध्ये आणि हिराबाई कांबळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या प्रत्येकीची कथा डोळ्यात पाणी आणणारी आहे.त्यांना न भेटता त्यांचे सन्मानपत्र लिहिणे कठीण होते; परंतु त्यांच्या संघर्षातून आपण प्रेरणा घ्यायला हवी, असे मत ज्योती जोशी यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन देवयानी गोंगले यांनी केले. मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, प्रतिभा शिंदे,अनुजा पाटील,मीनाक्षी नागरे व तेजस्विनी थिटे यांनी मानपत्राचे वाचन केले.