मुलांनी लुटला सर्कशीचा आनंद

“आपल्या अभिरुची वर्गातल्या आणि फुलवातल्या मुला-मुलींनी सर्कस पहावी.” हा विचार अभिरुची वर्ग घेणाऱ्या ताई-दादांच्या मनात आली आणि तो विचार प्रत्यक्षात येण्यासाठी ताई-दादांनी जी सर्कस केली ती मात्र सगळ्यांनी कौतुक करण्यासारखी होती.
सर्कस होती २६ तारखेला,पण त्याची तयारी अनेक दिवसांपासून चालू होती. कोण कोण येणार? त्यांच्या पालकांना पण यायला सांगू या का? त्यांनी सुद्धा पाहिलेली नाही म्हणून काही मुलांचे पालक सुद्धा यायला तयार झाले. सर्कशीपर्यंत कसे जायचे? रिक्षा करावी का? मुलांकडे लक्ष देण्यासाठी काय करता येईल? मुलांना खाऊ काय देऊ या? सगळ्यांना मिळेल हे कसं बघायचं? आपली मुलं कशी ओळखणार? सगळ्यांना सर्कस दिसेल असं बसवतांना काय करावं लागेल? रिक्षा तिथेच थांबून राहतील का? येतांना परत दुसऱ्या मिळतील का? हा सगळा खर्च आपल्या बजेटमध्ये कसा बसवणार? कारण जवळजवळ १३ वस्त्यांमधून मुलं सर्कस बघायला येणार होती. हे सगळं करत असतांना मुलांना ताई –दादांनी रागावून चालणार नव्हते.मुलांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला त्यांना उत्तर द्यायचे होते.
शेवटी तो दिवस उगवला,ताई-दादा सकाळपासून आपल्या नियोजनावर शेवटचा हात मारत घड्याळाकडे बघत होते.मुलांप्रमाणे ताई-दादा तयार झाले.आणि मुलांनी सर्कशीचा अनुभव घेतला. ‘सर्कस’ म्हटलं की डोळ्यासमोर काय काय येतं? लहान मुलांचे डोळे तर सर्कशीचा एवढा मोठा तंबू बघूनच विस्फारतात. झोके घेणाऱ्या मुली आणि त्याच्या साहय्याने केल्या जाणाऱ्या कसरती बघून तर मुलं अवाक होतात. हा सगळाच अनुभव वस्तीमधल्या तीनशे मुलांनी घेतला.
मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून ताई-दादा खूप खुश झाले. एवढंच नाहीतर सर्कसवाल्यांचा हा शो हाउसफुल गेल्याने कोविडच्या संकटावर मात करत आपला व्यवसाय करणाऱ्या सर्कसवाल्यांच्या चेहऱ्यावर स्मित आले.