चला बोलूया…..
मंदा काकू आज सकाळपासून शांत बसून राहिल्या होत्या.त्यांना बाहेर पडणे अवघड होते असे नाही.पण त्यांना बाहेर पडायचा कंटाळा आला होता.
“कोणा पुढे बोलण्यासाठी तोंड वेंगडायचं?पैसे देवून बोलायला माणूस ठेवूनही उपयोग झाला नाही.त्याला/तिला काहीच गप्पा मारता येत नाही. मनातलं,आतलं काहीच बोलता येत नाही.पोरा बाळांचं तरी किती बोलणार?सगळ्या लहानपणीच्या आठवणी,आता त्याला काय आवडतं काय माहित?” मंदा काकू हे सगळं मनाशी बोलल्या.त्या घरात एकट्याच राहत होत्या. मुलं परदेशी होती. काकुंना रोजचा थोडासा संवाद साधण्यासाठी कोणीतरी जवळ हवं असं वाटत होतं.पण आजूबाजूच्या प्रत्येकाला घाई आणि काकुंनी इतर कोणाशी पूर्वी फारसा संपर्क ठेवला नव्हता. त्यामुळे त्या वैतागल्या होत्या.
कोणाशी काही तरी बोलायला हवं? असं वाटत असतांना आणि आजूबाजूला परिसरात माणसं दिसत असतांनाही बोलायला माणूस न मिळणे ही आजची खूप मोठी समस्या आहे.अनेक घरांमध्ये अशी वयस्कर माणसं आहेत,ज्यांना बोलायचं आहे,मागच्या त्याच त्याच आठवणी सांगायच्या आहेत,जिवंत माणसांचा आपल्या भोवतीचा वावर अनुभवायचा आहे.पण त्यांना तो मिळत नाही.
काहीजणांनी तर मोलाने एखादी व्यक्ती गप्पामारण्यासाठी ठेवली आहे.ती व्यक्ती आठवड्यातून एक-दोनदा येते. वयस्कर माणसांच्या मुलांना फोन लावून देते,ऐकू आले नाही तर मुला-मुलींचे बोलणे परत परत सांगते.पण याने मनात असलेली संवादाची तहान भागत नाही. सगळा कोरडा व्यवहार वाटू लागतो.
अशी वेळ अनेकांवर आली आहे आणि अनेकांवर येणार आहे.काय करायला हवं त्यासाठी? आपल्या परिसरातील लोकांशी संपर्क ठेवायला हवा.खूपजण तर एकाच बिल्डिंग मध्ये रहात असून एकमेकांशी बोलत नाहीत. पण जस जसं वय वाढतं आणि बाहेर जाऊन काही करण्याचा उत्साह मावळतो त्यावेळी आपले शेजाऱ्यांशी असणारे सबंधच आपल्याला सोबत करतात हे आपण लक्षात ठेवायला हवे.अहंकाराने आपण आपल्यातला ओलावा कोरडा करत जातो.त्यापेक्षा एकमेकांची सोबत घेत,कधी माघार घेत जर संवाद ठेवला तर पुढे येणारा एकटेपणा काहीसा टाळता येवू शकतो. मग प्रीती मिळेल का बाजारी? असं म्हणण्याची वेळ येणार नाही.
तुम्हांला काय वाटतं? वयस्कर माणसांना बोलण्यासाठी कोणी हवं असेल तर काय करायला हवं?
वंचित विकास कार्यालय – 7972086730