सन्मान नवदुर्गाचा- दिवस सहावा -डॉ.दीप्ती बच्छाव
घरी आठ वर्षाचा स्वमग्न मुलगा, कामाच्या व्यापामुळे मुलाला अजिबात वेळ देता येत नाही. घरी थकलेले आई वडील, त्यातच पतीला कोरोनाचा झालेला संसर्ग, अशा कठीण परिस्थितीतही एक महिला डॉक्टर कोविड सेंटरमध्ये कोरोनाला चारीमुंड्या चीत करण्यासाठी सज्ज झाल्या.
डॉ.दीप्ती बच्छाव असे या रणरागिणीचे नाव आहे. त्या गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या येवलेवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये जीवाची बाजी लावून अहोरात्र कोविड रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांच्या या लढ्याला कुटुंबीयांची मिळणारी साथही तितकीच मोलाची आहे.
या कोविड केअर सेंटरमध्ये गेल्या सहा महिन्यात चार हजार कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर तीन हजार रुग्णांना होम quarantine करून उपचार केले आहेत. त्यामुळे या सेंटरचे काम नावाजलेले आहे. या सेन्टरच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. बच्छाव यांना त्याचे श्रेय दिले जाते.
प्रत्येक रुग्णाची लक्षणे वेगळी असतात. कुटुंबियांच्या मनात भीती आणि अनेक प्रश्न असतात. त्यांना समुपदेशन करून त्यांनी त्यांची भीती दूर करण्यासाठी डॉ.दीप्ती सातत्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करीत असतात.
यांचा सत्कार संस्थेच्या हितचिंतक श्रीमती अपर्णा गजेंद्रगडकर यांच्या हस्ते करण्यात आला.