फुलवा कथा – २ / कारवॉं
फुलवा कथा – २ / कारवॉं
आमचा नेपाळ निसर्गरम्य, सुन्दर आणि शांत देश आहे. पण निसर्गरम्यतेला शाप गरिबीचा, दारिद्र्याचा असतो. उपजाऊ जमीन नाही. त्यामुळे शेतात कमी पिकते. उद्योगधंदे नाहीत. हाताला काम नाही. ६-६ महिने बसून रहावे लागते. घरात खाणारी तोंडे भरपूर. कसे भागवायचे? शेवटी संसार बाईलाच रेटायचा असतो ना? पोरांचे उपाशी, कोमेजलेले चेहरे का बाईला बघवतात?शेवटी तिलाच हालचाल करावी लागते, काही तरी मार्ग काढावा लागतो. स्त्रियांसाठी समाजाने अगोदरच सर्व मार्ग आखून ठेवलेले आहेत. त्यात बाई माणसाला स्वतःचे मत असतेच कोठे? समाजाने आखलेल्या त्याच रुळलेल्या मार्गाने चालत रहायचे, ऊर फुटेस्तोवर धावत रहायचे!
गोर्यागोमट्या, गोल चेहेर्याच्या नितळ कांतीच्या आम्हा नेपाळी मुलींचे, बायांचे भारतीय लोकांना फार आकर्षण! मग काय कधी गोड बोलून, कधी फसवून, कधी धमकावून, कधी पळवून नेऊन, भारतातील शहरांमध्ये आमची रवानगी केली जायला लागली. अनेक वर्षांपासून असेच चालू आहे. मी कोमल, काठमांडू जवळच्या कलंकीची. कलंकीला, गावाकडे येऊन ३-४ महिनेच झाले. आधी पुण्याला लालबत्ती भागात कोठेवालीकडेच होते. बरोबर मुलगी करिष्मा असायची. तीही आता ८-९ वर्षांची झालेली आहे. आता धंदा करायला नको वाटते. हरामाचा पैसा कमवायला नको वाटते. करिष्मा बेटी पण मोठी होत आहे. कष्ट करून मेहनत करून पैसे मिळवावेत, मानाने जगावे, करिष्मा बेटीला शिकून मोठे करावे या विचाराने गावाकडे परत आले.
गावाकडे चाचा, चाची त्यांची मुले, माझे लहान भाऊ आहेत. आई वडिल वारले, गोड बोलून चाचाने मला पुण्याला नेपाळी पूजा आंटीच्या कोठीवर पाठवून दिले. लहान भावांसाठी, चाचा चाची साठी नियमित पैसे मी घरी पाठवायला लागले. वाटले होते गावाकडे चांगले स्वागत होईल. प्रेमाने सगळे चौकशी करतील. पण कसचे काय. सगळ्यांनी अडचणींचे पाढे वाचायला सुरुवात केली. माझे कलंकीला येणे कोणाला आवडलेले दिसले नाही. आजूबाजूला शेतात काम मिळते का पाहिले पण रोज काम मिळायचे नाही, सतरंजी, गालिचे तयार करणार्या कारखान्यात सुद्धा कायम काम नव्हते. आपण येथे उपरे आहोत कोणालाच नको आहोत अशी भावना निर्माण व्हायला लागली. मन उदासीनतेने, नैराश्याने ग्रासून गेले. करिष्मा बेटीची काळजी, चिंता वाटायला लागली. काही तरी करणे भाग होते. पुण्याच्या लालबत्ती मधून पूजा आंटीचे, कोठीवालीचे फोन यायला लागले होते. करिष्माच्या बापानेही एकदा फोन केला होता. घरातील लोकही माझ्याकडे अपेक्षेने पहायला लागले. मी जाणार म्हणून सगळ्यांचे चेह्रेरे उजळले.
अजूनही मला ती तारीख आठवत आहे, २२ मार्च (२०२०) ला रविवारी रात्री जड मनाने सगळ्य़ांचा निरोप घेऊन मी आणि करिष्मा बेटी कलंकीहून बसने भारताच्या सीमेवरील सुनौली ला निघालो. ८ तासाचा प्रवास करून सकाळी सुनौलीला पोहोचलो. कोणीही फारसे लक्ष दिले नाही. तपासणी पण केली नाही. काय तपासणी करणार म्हणा रोज ५०-६० मुली, तरुणी भारतात आणल्या जातात, वेगवेगळ्या शहरात पाठवल्या जातात. सुनौलीहून गोरखपूरला ३ तासात आलो. मावशीकडे थांबले. तिला फार आनंद झाला. गळाभेट झाली. तिने जेवणाचे डबे भरून दिले. माझी ही अवस्था पाहून मावशी खूप रडली. आता परत कधी भेट होईल हे पशुपतिनाथच जाणे. २३ तारखेला संध्याकाळी ५ वा. गोरखपूर – पुणे रेल्वेत बसलो. लखनौ, कानपूर, भोपाळ, भुसावळ मार्गे मंगळवारी २४ मार्च ला मध्यरात्री अहमदनगरला आलो. तेथे गाडी खूप वेळ थांबून राहिली. रात्रीची वेळ असल्यामुळे बाहेर काय चालले आहे ते कळायला मार्ग नव्हता.
खूप लांबचा प्रवास असल्यामुळे आम्ही दमून गेलो होतो. एकदम सकाळीच जाग आली. पहाते तर काय आम्ही अहमदनगर येथेच होतो. रेल्वे अहमदनगर च्या पुढे गेलीच नव्हती! खाली उतरलेले लोक सांगत आले, रेल्वे पुढे जाणार नाही. सरकार ने २४ मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. मी तर गोंधळूनच गेले. पुढे समजले, सरकारने कोरोना नावाच्या आजाराची साथ पसरू नये म्हणून सर्व भारतात लॉकडाऊन जाहीर केला आहे. करिष्मा बेटीला बरोबर घेतले, सगळे सामान घेऊन मी खाली उतरले. स्टेशनच्या बाहेर आले. बाहेर पाह्ते तर काय. पोलीस सगळीकडे उभे होते. रिक्षा बंद होत्या. बसेस बंद होत्या. सगळी दुकाने बंद होती. पोलीस सगळ्यांना घरी जायला सांगत होते. आम्हाला तर पुण्याला जायचे होते. पोलीस म्हणाले, सर्व रेल्वे, बस बंद आहेत. तुम्हाला येथेच रहावे लागेल गाव सोडून जाता येणार नाही. गाव बंदी आहे. अहमदनगर सोडून तुम्हास पुण्याला जाता येणार नाही.
आता मात्र मी घाबरून गेले. मी एकटी बाई माणूस करिष्मा बेटी ला घेऊन या अहमदनगर सारख्या परक्या, अनोळखी गावात कशी राहणार? सगळी दुकाने बंद, हॉटेल बंद. रेल्वे स्टेशन सुद्धा बंद केले होते. ज्यांची नगरला राहण्याची सोय होती ते सगळे निघून गेले. आम्ही ५०-६० लोक तसेच स्टेशनवर बसून राहिलो. पण तेथेही पोलीस बसू देईनात. सारखे ओरडायला लागले. हाकलून द्यायला लागले. काय करू? कोठे जाऊ? करिष्मा बेटी बिचारी घाबरून गेली होती. माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघायला लागली. मुलांची ही नजरच आईला जगण्याचे, संकटावर मात करण्याचे बळ देत असते नाही का? आता मला बसून राहणे चालणार नव्हते. काही तरी हालचाल करणे भाग होते. काही तरी निर्णय घेणे भाग होते. सगळे रस्ते बंद होते. रस्त्यावरून जाणे शक्य नव्हते. बरोबरच्या इतर लोकांबरोबर चर्चा करून, बोलून निर्णय घेतला. रेल्वेच्या रुळावरून, रेल्वे मार्गावरून चालत पुण्यापर्य़ंत जायचे.
कसलाही मागचा पुढचा विचार न करता रेल्वे मार्गावरून पुण्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. हळू हळू चालायला लागलो. मार्च महिन्यातील ऊन मी म्हणत होते. आता सूर्य डोक्यावर आला होता. थोडेतरी चालणे भाग होते. नगरच्या वेशीबाहेर जाणे आवश्यक होते. मग पोलीसांचा त्रास कमी होणार होता. पण करिष्माबेटी ला घेऊन चालणे सोपे नव्हते. तिच्याशी गोड बोलत, गप्पा गोष्टी करत चालणे सुरु ठेवले. दुपारची वेळ झाली होती. ऊन खूपच वाढले होते. आम्हाला नेपाळी लोकांना एवढ्या उन्हाची सवय नसते. रेल्वे रुळावरून उतरलो. आजूबाजूला झाडी पाहून तेथे थांबलो. बरोबर ७-८ बायका होत्या. डबे काढले. बोलणे सुरु झाले. त्या बायका माझ्याकडे टक लावून बघायला लागल्या. नेपाळी बाई कडे कोणी चांगल्या नजरेने बघते का? त्यांना संशय यायला लागला. मग मी पण ठोकून संगितले, आमचा स्वेटर, गरम कपडे विकायचा व्यवसाय आहे. पाडव्याला व्यापारी लोक हिशोब पूर्ण करतात म्हणून आले आहे. बघा ना नेमका आजच पाडवा आहे (बुधवार, २५ मार्च). करिष्माचा बाप पुण्यातच राहिला आहे. मग त्यांचे समाधान झाले.
झाडाखाली गारव्यात कधी झोप लागली ते कळलेच नाही. करिष्मा बिचारी दमून गेली होती. ऊन उतरायला लागले. आता निघायला हवे होते. चालत जायला करिष्माबेटी कुरकुर करायला लागली. बिचारी घाबरून गेली होती. पण निघणे भाग होते. थोडेसे गोड बोलून, समजूत काढून निघालो. आता ५-७ लोकांच्या गटाने चालायला सुरुवात केली. संध्याकाळ झाली. अंधार पडायला लागला. अंमळनेर ओलांडले होते. सारोळा आले. आता मात्र अंधारात पुढे जाणे शक्य नव्हते. बाजूच्या शेतात थांबलो. आजूबाजूला गावकरी जमा झाले. त्यांना मदत मागितली. सगळ्यांनी मदत केली. ज्वारीचे पीठ दिले, आम्ही भाकर्या करून घेतल्या. शेतातच झोपलो.
सकाळी उठल्यावर बघितले तर काय करिष्मा बेटी चा पाय टम्म सुजला होता. तिला उभे राह्ता येत नव्हते. पण थांबणे शक्य नव्हते. शेतकर्याच्या आईने करिष्माला पायाला लावण्यासाठी तेल दिले. मला मीठ बांधून दिले. म्हणाली, तुम्हाला उन्हाची सवय नाही. उन्हात फिरल्याने घाम येतो, शरीरातील पाणी कमी होते. थोडे थोडे मीठ खात जा. त्यामुळे थकवा येणार नाही. डोके दुखणार नाही. चक्कर येणार नाही. करिष्मा बेटीला उभेच राहता येत नव्हते. आता काही तरी निर्णय घेणे भाग होते. त्याच
शेतकर्याकडे सामान ठेवले. अगदी आवश्यक सामान पिशवीत घेतले, करिष्माला पाठीवर बांधले. हातात धरायला काठी घेतली. आणि रेल्वे रूळावरून चालायला सुरुवात केली. माझे बघून इतरांनीही आपल्या जवळचे सामान कमी केले.
रेल्वे रुळावरून चालणे फार अवघड असते. मोठे रूळ असतात पण ते उन्हाने तापतात. रुळाच्या दोन्ही बाजूला खडी टाकलेली असते. ती मोठ्या आकाराची आणि टोकदार असते, पायाला टोचते. ती खडी निसरडी असते. जागा सोडते. त्यामुळे स्थिर उभे राहता येत नाही. हातातील काठी खडीवर नीट टेकवता येत नाही. बाजूची पायवाट खूप लहान असते. कसाबसा एक माणूस त्या पायवाटे वरून चालू शकतो. या सगळ्या अडचणीत डोक्यावर तळपत्या ऊन्हाचा त्रास सहन करीत करिष्माला पाठीवर घेउन चालत राहणे खूप त्रासदायक होते.
मला थांबून चालणार नव्हते. कोणाची तक्रार करून चालणार नव्हते. मला चालायचे होते. फक्त चालायचे होते. पुण्याला पोहोचायचे होते. संध्याकाळी विसापूर रोड ला पोहोचलो. गावकर्यांनी जमेल तशी मदत केली. म्हणाले, कायम तोंडावर कापड बांधा, कोणत्याही गावात जाऊ नका. पोलीस तुम्हाला शाळेत थांबायला लावतील. किमान १४ दिवस तेथेच रहावे लागेल. तसा नियमच आहे. आता हे नवीनच संकट उभे राहिले! थोडासा आसरा शोधून तसेच पडून राहिलो.
आता करिष्माबेटी ला थोडे बरे वाटत होते. पण चालण्याची ताकद नव्हती. हळूहळू चालणार्यांची संख्या पण कमी होत होती. लोक आजूबाजूच्या गावांमध्ये विखुरले जायला लागले. जवळचे खाणे संपत आले होते. पुढे काय होणार कोणास ठाऊक. संध्याकाळी श्रीगोंदा स्टेशन आले. हे साखर कारखान्याचे गाव आहे. सगळी दुकाने बंद असली तरीही औषधाचे दुकान मात्र चालू होते. त्याच्या कडून करिष्माबेटी साठी मलम, तेल घेतले. इतर बायांनी पण औषधे घेतली. दुकानदाराच्याच ओळखीने मंदिरात अन्न वाटप चालू होते तेथे दोन दिवस पुरेल इतका शिधा घेतला. परत स्टेशनवर गेलो. आडोसा हुडकला.
सकाळी लवकर उठलो आणि चालायला लागलो. पायाला मी आता मोठे कापड बांधले होते. त्यामुळे चपलेतून खडी बोचत नव्हती. पण करिष्माबेटी चा चालण्याचा वेग कमी होता. ती पाठीवर बसून कंटाळायची, मग हळूहळू चालायची. बरोबर अजून एक मुलगा होता. त्याच्याबरोबर दोस्ती झालेली होती. मग ते रमतगमत चालायचे. मध्येच एखादी मालगाडी यायची. मग बाजूला उभे रहावे लागत असे. काष्टीरोड स्टेशनला मात्र विचित्र अनुभव आला. गावात कोणी येऊ देत नव्हते. तुमच्या मुळे आम्हाला कोरोना होईल म्हणायला लागले. पिण्याचे पाणीसुद्धा कोणी देईना. शेवटी कोणाशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. जे आहे ते सहन करीत पुढे जाण्यात शहाणपण होते. नाहीतरी आयुष्यात कोठे काय मनात सारखे घडले होते? जे सामोरे येईल ते सहन करीत गेले. मनाविरुद्ध काही घडले तर त्याकडे दुर्लक्ष करीत गेले. नुसतेच जगणे चालू होते. कशातच सुख, आनंद, समाधान नव्हते.
दिवे लागणीला दौंड स्टेशन आले. बर्याच रेल्वेगाड्या, मालगाड्या उभ्या होत्या. स्टेशन वरील सगळी दुकाने बंदच होती. हमाल लोक फलाटावर बसून होते. त्यांना काहीच काम नव्हते. आम्ही अहमदनगर हून चालत आलेलो आहोत, आज २८ मार्च, चालण्याचा चौथा दिवस आहे असे सांगितल्यावर सगळे चकित झाले. आडोशाला बसायला सांगितले. तासाभरात त्यांनी भाजी भाकरीची सोय केली. पहाटे लवकर उठून जायला सांगितले.
सकाळी लवकरच परत चालायला सुरुवात केली. निम्मे अंतर पार पडले होते. आता सगळे व्यवस्थित पार पडू दे म्हणून पशुपतीनाथाला, कुमारी देवी ला साकडे घातले. कितीही वेगात चालायचे ठरविले तरी ते शक्य नव्हते. ऊन खूप होते. करिष्मा बेटी ला पाठीवर घ्यावे लागायचे किंवा तिच्या वेगाने चालावे लागायचे. आता ती हट्ट करीत नव्हती. पण काही बोलत ही नव्हती. काही मागत ही नव्हती. गुपचूप बसून रहात असे. सांगितलेले सगळे ऐकत असे. पाटस स्टेशन ला मुक्काम केला. दुसर्या दिवशी यवत स्टेशन जवळ मुक्काम केला. आता बाजूला ऊसाचे मळे होते. थोडासा थंडावा होता. फार ऊन लागले तर गारव्यात बसता येत होते. शेतकरी, गावकरी जमेल तशी मदत करायचे. सगळीकडे दुकाने बंदच होती. त्यामुळे देतील त्या भाजी भाकरीवर भागवावे लागत होते. प्यायला पाणी मिळत होते. पुढे मांजरी आणि हडपसर ला मुक्काम केला. २५ मार्च ला अहमदनगर हून पायी निघालो आणि पुणे स्टेशन वर १० व्या दिवशी ०३ एप्रिल ला पोहोचलो. सुमारे १६० किमी अंतर पायी चालून कापले. सगळ्या बाया माणसांचे निरोप घेतले. त्यांनी आवर्जून मला घरी बोलावले होते. मी कोणालाही बोलावले नाही. कारण मला घरच नव्हते. ’ते’ घर बोलावण्यासारखे पण नव्हते.
पुणे स्टेशन वरून लालबत्ती परिसरात आले. पोलीसांनी परिसरातील सगळ्या रस्त्यांवर आडवे बांबू लावले होते. बाहेरच्या लोकांना आत येऊ देत नव्हते. कोणाला बाहेर जाऊ देत नव्हते. वस्तीमधील ओळख सांगून पूजा आंटीच्या कोठीवर आले. आता धंदा पूर्णपणे बंद होता. ३-४ महिने नुसतेच बसून गेले. पूजा आंटीने सांभाळले. हल्ली करिष्मा फार बारिक डोळे करून बघायला लागली होती. तिला नीट दिसत नाही असे वाटायला लागले. वस्तीतील बायकांनी सांगितले, तू फुलवामध्ये करिष्माला घेऊन जा. तेथे सध्या रोज मुलांना नाश्ता देतात. तेथील तृप्तीताई, आरतीताई, डॉक्टर मंडळी तुला मदत करतील.
करिष्माला घेऊन फुलवामध्ये आले. सर्वांनी प्रेमाने स्वागत केले. चौकशी केली. त्यांना सगळी माझी कहाणी सांगितली. त्या मला नारायण पेठेतील कार्यालयात घेऊन गेल्या. तेथे त्यांनी मीनाताईंची भेट घालून दिली. त्यांनी लगेच डोळ्याच्या डॉक्टर कडे करिष्माला पाठविण्याची सोय केली. मला महिनाभर पुरेल असा किराणा दिला. मी अहमदनगरहून पुण्याला करिष्माला घेऊन चालत आले हे सांगितल्यावर मीनाताईंना खूप आश्चर्य वाटले. कौतुक वाट्ले. त्यासारखे मला एकच प्रश्न विचारत होत्या, तुला हे कसे जमले. आणि मी त्यांना सांगत राहिले,
मैं मेरी उम्मीद पर कायम थी. मैंने हिंमत नहीं हारी. मैं चलती रही, चलती रही. और आखिर मुझे मंझिल मिल ही गयी.
(दि. ०४/०९/२०२०)