हळदीने माखलेला वर
लालबत्ती परिसरात एका २२ – २५ वयाच्या तरुणाने धूम मचवली होती. त्याने कपाळावर मुंडावळ बांधलेली होती. संपूर्ण अंगाला हळद लावलेली होती. तो तरुण रस्त्यावर गिऱ्हाईकाची वाट बघत उभे राहणाऱ्या, खिडकीत बसणाऱ्या, दरवाजाच्या पायरीवर बसणाऱ्या प्रत्येक बाईला विचारायचा, माझ्याशी लग्न करशील का ? या अनपेक्षित प्रश्नाने बायका फार गोंधळून गेल्या होत्या. नंतर मात्र त्याची चेष्टा करायला लागल्या.
आपल्या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या कानावर तोपर्यंत ही बातमी गेलेली होतीच. तेही गोंधळून गेले होते. शेवटी कार्यकर्त्यांनी निर्णय घेतेला, या प्रकरणाचा छडा लावायचाच. प्रथम त्या तरुणास वस्तीतून शोधून काढले. त्या तरुणाशी गोड बोलून कार्यकर्त्यांनी त्याला संस्थेच्या कार्यालयात आणले. बसायला खुर्ची दिली. चहापाणी केले. त्याच्या कलाने घेत हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रथम तो खरे बोलत नव्हता, विसंगत उत्तरे देत होता. तो मनाने खचला होता. त्याला बोलते करायला खूप अवधी दयावा लागला.
हळू हळू त्याने स्वतःविषयी बोलायला सुरुवात केली, तो नगर जिल्ह्यातील एका खेडयातून आलेला होता. दुसऱ्या दिवशी त्याचे लग्न होणार होते. घरात पाहुणे जमा झाले होते. ऐन वेळेस कोठे माशी शिंकली कोण जाणे. मुलीने लग्नास नकार दिला. घरी गोंधळ उडाला. नकाराचे खरे कारण कोणालाच कळेना. वर मुलावर यामुळे मोठाच ताण पडला. एका बाजूला मुलीने नकार देण्याचे दुःख होते तर दुसऱ्या बाजूस नातेवाईक, गावातील लोक यांच्यासमोर झालेली मानहानी पचवणे जड जात होते. अशा विलक्षण नाजूक परिस्थितीत मुलाची अवस्था केविलवाणी झालेली होती. अशा वेळेस त्याला समजून घेणे, धीर देणे गरजेचे होते. परंतु परिस्थिती जबाबदारीने हाताळण्या ऐवजी जवळच्या मित्रांनी त्याला सल्ला दिला, तु पुण्याला जा, तेथे बुधवार पेठ आहे. तेथे पाहिजे तेवढया मुली मिळतात. त्यापैकी कोणाशीही लग्न कर आणि तिला घेऊन गावाकडे परत ये.
आणि म्हणून हा मुलगा पुण्यातील लालबत्ती परिसरात आला, मुंडावळ बांधून, अंगाला हळद लावून लालबत्ती परिसरात शरीर व्यवसाय करणाऱ्या बायकांना माझ्याशी लग्न करशील का म्हणून विचारत फिरत होता. संस्थेच्या कार्यकर्त्यांना आता परिस्थिती लक्षात आली. आपल्या संस्थेचे कार्यकर्ते सतत बोलत राहिले, त्याला धीर दिला, संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. त्याच्यामध्ये विश्वास निर्माण केला. त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यांना पुण्यात बोलावून घेतले. अशा वेळेस काय काळजी घ्यावी यासंबंधी प्रबोधन केले. आणि या मुलाला पालकांच्या ताब्यात दिले. आपली संस्था केवळ शरीर व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आरोग्य विषयक प्रश्नावर काम करीत नाही तर परिसरातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुध्दा कार्यरत आहे.
दि. १७ / ०१ / २०२०
(वंचित विकास संस्था, पुणे ही १९९५ पासून लालबत्ती भागात शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी शिक्षण, आरोग्य, स्व-ओळख निर्माण करणे संबंधी काम करीत आहे. महिलांना शोषणमुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे. नाईलाजाने, फसवणुकीने, जबरदस्तीने आलेल्या, आणलेल्या या दुर्दैवी महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे.)