सोनू – मोनू ची गोष्ट ( भाग-2 ) – Vanchit Vikas

सोनू – मोनू ची गोष्ट ( भाग-2 )

Posted By :

दि. २५/०१/२०२०

वंचित विकास संस्थेचे लालबत्ती भागात दवाखाना आणि सल्ला मार्गदर्शन केंद्र आहे. रेखाराणी मागील २० वर्षांपासून ती आपल्या संस्थेत विविध कामासाठी येत असे. तिला संस्थेविषयी विश्वास होता. जिव्हाळा होता. त्यामुळे रेखाराणीने  आपल्या भाच्याना, सोनू  (वय ५ वर्षे ) आणि मोनू (वय ३ वर्षे ) यांना सल्ला मार्गदर्शन केंद्रात आणले. त्या दोघीही प्रचंड घाबरल्या होत्या. बधीर झाल्या होत्या. त्यांचे चेहरे निस्तेज आणि भावनाविहीन  दिसत होते. सल्ला मार्गदर्शन केंद्रातील कार्यकर्ते त्यांच्याशी प्रेमाने वागायचे, मायेने जवळ घ्यायचे. त्यांना बोलते करण्यासाठी प्रयत्न करायचे. सकाळी लालबत्ती परिसरातील आपल्या संस्थेच्या  ‘‘ फुलवा ” या पाळणाघरात त्यांची आत्या त्यांना सोडत असे.

त्या मुलींना फक्त नेपाळी भाषाच येत असे. मराठी-हिंदी भाषेचा त्यांना गंधही नव्हता. हळूहळू ४-५ महिन्यात त्यांना सरावाने हिंदी भाषा समजायला लागली. तोडके मोडके हिंदी बोलतापण यायला लागले. मोनू कार्यकर्त्यांशी बोलायला लागली, तिने सांगितले, भूकंपाच्या दिवशी (नेपाळ मध्ये २५ एप्रिल २०१५ या दिवशी खूप मोठा भूकंप झाला होता.), जमीन फट गया. मेरा बकरी, भैंस अंदर गया. बडे पापा, बडी मां सब लोग अंदर गया. हम लोग जोरसे मैदान में भागे. घर तो नहीं रहा, हम अकेला हो गया.  लेकिन मेडम तुम फिकीर मत करना, हम लोग खेतमें राई डालते है. बारीश होने  के बाद वो उपर आती है. वैसेही ये लोग बारीश होने  के  बाद उपर आएंगे. निसर्ग आणि व्यावहारिक जीवनाची या निरागस मुलीने घातलेली सांगड पाहून सर्वच कार्यकर्ते हेलावून गेले ! या मुली पुढे मोठया झाल्यावर त्यांना आई-वडिलांच्या मृत्यू चे वास्तव समजले तर  त्या हे दुःख कसे सहन करतील याची काळजी कार्यकर्त्याना वाटायला लागली.

            कार्यकर्ते, शिक्षिका, सोनू- मोनू ला समजावून सांगत असत, आई-बाबा असे आपोआप वर येत नाहीत. ते खूप खूप लांब गेलेले आहेत. आता आपण शहाण्यासारखे वागायचे इ. पुढे सोनू-मोनू ५-६ वर्षे नीहार मध्ये पण छान राहिल्या. त्यांची अभ्यासातील प्रगती पण चांगली होती.

सोनू-मोनू ची आत्या शरीर विक्रय करीत असे. पण या दोघी भाच्या त्यापासून दूर राहिल्या. त्या या व्यवसायामध्ये आल्या नाहीत. हे संस्थेचे मोठेच यश होते.  आधी सल्ला मार्गदर्शन केंद्र मध्ये, शिकण्यासाठी फुलवामध्ये आणि नंतर नीहार मध्ये गेल्या. नंतर नेपाळ मधील इतर जवळचे नातेवाईक सोनू-मोनू ला परत घेऊन गेले.

टीप – सर्व नावे काल्पनिक आहेत.

(वंचित विकास संस्था, पुणे ही १९९५ पासून लालबत्ती भागात शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी शिक्षण, आरोग्य, स्व-ओळख निर्माण करणे संबंधी काम करीत आहे. महिलांना  शोषणमुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे. नाईलाजाने, फसवणुकीने, जबरदस्तीने आलेल्या, आणलेल्या या दुर्दैवी महिलांच्या  पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे.)