सोनू – मोनू ची गोष्ट ( भाग – १ ) – Vanchit Vikas

सोनू – मोनू ची गोष्ट ( भाग – १ )

Posted By :

दि.२३/०१/२०२०

मुलांचे संगोपन करणे, त्यांचे हवे नको पहाणे, नवऱ्याचे बघणे, पै पाहुणे, यांचे बघणे या सर्व जबाबदाऱ्या महिलांनाच  पार पाडाव्या लागतात. कोणतेही असमानी सुलतानी संकट आले तरी पहिला बळी स्त्रियांचाच पडतो. पूर,दुष्काळ,भूकंप या नैसर्गिक आपत्तीत स्त्रियांनाच कंबर कसून उभे रहावे लागते.

मराठवाडयात भीषण दुष्काळ पडला की लालबत्ती भागात मोठया प्रमाणात मराठवाडयातील महिला दिसायला लागतात. ईशान्य भारत कायमच धगधगत असतो. संप, दंगलींमुळे, पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे  सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता सतत निर्माण होत असते. अशा परिस्थितीत  त्या भागातील महिलांची संख्या लालबत्ती परिसरात वाढायला लागते. थोडक्यात सांगायचे तर लालबत्ती परिसर हा आपल्या समाजाचा melting pot – स्वतःच्या आयुष्याची आहुती देणारा महिलांसाठी  धगधगता अग्नीकुंड आहे ! नैसर्गिक आपत्ती आली की त्या भागातील दलाल सतर्क होतात. मोठया शहरांमध्ये कामाचे, चांगल्या पगाराचे  अमिष दाखवले जाते. महिलांना घर चालवायचे असते, मुलांचे बघायचे असते, कच्च्या बच्च्यांना  चार  घास भरवायचे असतात. नैसर्गिक आपत्तींमुळे त्या त्या भागात तशीही जगण्याची संधी कमी होत जाते. गाव सोडण्याशिवाय पर्याय नसतो. विविध प्रलोभनांना गरीब, वंचित,शोषित बायका बळी पडतात. आणि पैसे मिळविण्यासाठी शहराची वाट धरतात.

२५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळ मध्ये ७.८ ते ८.१ रिश्टर स्केल चा भूकंप झाला. सुमारे ९,००० लोक मृत्युमुखी पडले तर २२,००० लोक जखमी झाले. सुमारे ६ लक्ष इमारतींची पडझड झाली. एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान नेपाळच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५०% होते. हजारोंच्या संख्येने महिलांनी भारताची वाट धरली. भारत नेपाळ सीमेवर सुनाली नावाचे गाव आहे.दोन्ही देशातील नागरिक त्या गावातून मोठया प्रमाणावर ये जा करीत असतात.  भूकंपाचे वृत्त समजताच लालबत्ती परिसरातील काही नेपाळी महिला तातडीने गावाकडे धावल्या. त्यामध्ये रेखाराणी पण होती. तिचे गाव काठमांडू पासून ३ दिवस चालण्याच्या अंतरावर होते ! गावाकडील दृश्य हृदयद्रावक होते. अर्धे अधिक गाव एका मोठया घळी मध्ये गुडूप झाले होते !

रेखाराणीचे नातेवाईक कोठेच दिसेनात, घरही गायब झाले होते. तिने खूप शोधाशोध केली. शेवटी सरकारी मदत केंद्रात तिच्या भावाच्या दोन मुलींचा शोध लागला. मोठीचे नाव सोनू , वय ५ वर्षे आणि तिच्या लहान बहिणीचे नाव मोनू , वय ३ वर्षे. भावाच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली होती. खूप कठीण प्रसंग होता. रेखाराणीच्या भावनेचा बांध फुटला, दोन्ही भाच्यांना उराशी घेऊन ती खूप रडली. सर्व सरकारी सोपस्कार पूर्ण करून ती आपल्या भाच्याना घेऊन परत पुण्याला लालबत्ती भागात परतली.

टीप – सर्व नावे काल्पनिक आहेत.

(वंचित विकास संस्था, पुणे ही १९९५ पासून लालबत्ती भागात शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी शिक्षण, आरोग्य, स्व-ओळख निर्माण करणे संबंधी काम करीत आहे. महिलांना  शोषणमुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे. नाईलाजाने, फसवणुकीने, जबरदस्तीने आलेल्या, आणलेल्या या दुर्दैवी महिलांच्या  पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे.)