रेश्मा – एक यशस्वी उदयोजिका – Vanchit Vikas

रेश्मा – एक यशस्वी उदयोजिका

Posted By :

१३.०१.२०२०

नेपाळ हा निसर्ग सुंदर देश आहे. पण त्याला दारिद्र्याचा शाप आहे. डोंगर दऱ्या असल्यामुळे शेती करणे फार अवघड आहे. जगण्याच्या संधी पण खूप कमी आहेत.रेशमा ही नववीत शिकणारी, १४-१५ वर्षांची गोरीपान आणि आकर्षक नेपाळी मुलगी होती.तिचे केस सोनेरी होते. ती आई जवळ रहात असे. वडील बौद्ध भिक्षुक होते. धर्मप्रसारासाठी  विविध देशात फिरत असत. घरी कधी नसायचेच.

घरी थोडीफार शेती होती. ती रेशमाची आई बघत असे. घरातील इतर नातेवाईक,भाऊबंद, यांच्यामध्ये शेत जमिनीवरून कुरबुरी होत असत. घरात कोणी पुरुष माणूस नसल्याचा गैरफायदा घेऊन इतर नातेवाईक मंडळीना भांडण करण्यास अधिकच चेव येत असे. पण रेशमाची आई खंबीर होती. एकदा संध्याकाळी अशाच वादाला सुरुवात झाली, वाद विकोपास गेले. भाऊबंदांनी डाव खेळला. त्यांनी चक्क रेशमाला उचलले आणि पळवून नेले.

ही बातमी कळताच वडील तातडीने परदेशातून परत आले. आई वडिलांनी सतत ८-१० वर्षे कसून शोध घेतला पण त्यांना रेशमा सापडली नाही. रेशमाच्या नातेवाईक मंडळींनी चक्क तिला पुण्यातील लालबत्ती परिसरात आणून विकले होते ! ती प्रचंड घाबरली होती. तिला नेपाळी भाषेशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती. तिच्यासाठी बाहेरील जगाचे दरवाजेच बंद झालेले होते.

हळूहळू तिला हिंदी भाषा समजायला लागली. मोडके तोडके हिंदी बोलता यायला लागले. काही ना काही निमित्ताने ती वंचित विकास संस्थेच्या दवाखान्यात यायला लागली. नशिबाने तिच्यावर घरवालीचे काही कर्ज नव्हते. एक तरुण सतत तिच्याकडे यायला लागला. तो तिच्या प्रेमातच पडला होता म्हणाना ! तो तरुण मुलगा एका प्रतिष्ठित घरातील होता. दरम्यान त्या तरुणाने रेशमाशी लग्न पण केले ! त्यांना एक मुलगा पण झाला. पण मुलाचे आई वडील हे रेशमास स्वीकारायला तयार नव्हते. एवढेच नाही तर तिला घरी सुद्धा येऊ देत नसत.

या काळात आपल्या संस्थेने तिला खूप मानसिक आधार दिला. लालबत्ती वस्तीतून बाहेर पडण्यासाठी तिला मदत केली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात ती मदतनीस म्हणून काम करायला लागली. फावल्या वेळात रेशमा ने ब्यूटी पार्लर आणि कपडे शिलाई चा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता ती या व्यवसायात चांगल्या पद्धतीने स्थिरावली आहे. या साठी वेळोवेळी संस्थेने रेशमास आधार दिला. आज ती स्वतःच्या कुटुंबामध्ये आनंदाने रहातआहे. दुर्दैवाने समाजाच्या प्रवाहातून बाहेर पडलेली रेशमा आता समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेली आहे.

(वंचित विकास संस्था, पुणे ही १९९५ पासून लालबत्ती भागात शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी शिक्षण, आरोग्य, स्व-ओळख निर्माण करणे संबंधी काम करीत आहे. महिलांना  शोषणमुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे. नाईलाजाने, फसवणुकीने, जबरदस्तीने आलेल्या, आणलेल्या या दुर्दैवी महिलांच्या  पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे.)