यशस्विनी – १५ (ब)/सावित्रा – Vanchit Vikas

यशस्विनी – १५ (ब)/सावित्रा

Posted By :

       लातूर जिल्हयातील  निलंगा तालुक्यातील हडोळी गावची सावित्रा ९ वी पास झालेली होती.वयाच्या १८ व्या वर्षी तिचे लग्न झाले. पण मुलगी झाली म्हणून सासू त्रास देऊ लागली. नवरा दारू पिऊन मारहाण करू लागला. दोन तोळे सोने आणि पन्नास हजार रुपये माहेरून आणण्याची मागणी करू लागले. जाच असह्य झाला तेंव्हा सावित्रा मुलीसह माहेरी आली. लग्नानंतर तीन वर्षातच या घटना घडल्या.

       वंचित विकास ची कार्यकर्ती संगीताताई हिच्याकडून लातूरच्या सबला महिला केंद्राची माहिती मिळाली. तेंव्हा सावित्रा केंद्रात शिकायला आली. केंद्रात शिकायला येण्यासाठी घरच्यांचा पाठिंबा होता.

       केंद्रातून  शिकून गेल्यानंतर सावित्राने  नवऱ्यावर पोटगीसाठी दावा लावला. बऱ्याच काळानंतर कोर्टाने पोटगी मंजूर केली तरी नवरा ती कोर्टात भरेलच याची खात्री नसते. मग पुन्हा कोर्टात चकरा माराव्या लागतात. पोटगी भरली नाही तर कोर्ट नवऱ्याला अटक करू शकते. पण त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. गरीब स्त्री पोटासाठी काम करेल की कोर्टाच्या चकरा मारत बसेल? त्यामुळे पोटगीची रक्कम हातात पडली तरच नवल वाटावे अशी परिस्थिती असते. त्यामुळे वकील लोक तडजोड करून एकरकमी काही रक्कम मिळवून देतात. त्यापैकी बराच पैसा फीस म्हणून वकिलाला जातो. उरलेली रक्कम वडील स्वतःच्याच नावाने बँकेत टाकतात. हा सगळीकडचा अनुभव आहे. सावित्राच्या बाबतीत यातील काहीही झालेले नाही. ती बिचारी केंव्हा ना केंव्हा पोटगी मिळेल या आशेवर आहे. खेडयातील हे नवरे नोकरी करीत नसतील व शेतातच काम करीत असतील तर पोटगी मिळण्याचे काही खरे नसते. नोकरी करणारा नवरा असेल तर त्याच्या पगारावर  टाच आणता येते.

       केंद्रात शिक्षण घेऊन आल्यापासून सावित्रा  शिवणकाम करीत आहे. बकरीपालनाचा व्यवसाय ही करीत आहे. त्यातून बऱ्यापैकी पैसे तिला मिळतात. आयुर्विमा चे ती हप्ते भरते. नियमित बचतही करते. मुलीला शिकवून तिचे लग्न करून देणे हेच तिचे ध्येय आहे. विधवा व परित्यक्तांनाही ती मदत करते.