यशस्विनी – १२ (ब) / गौरी
गौरीचे लग्न १४ व्या वर्षी झाले. ती केवळ एक महिना सासरी राहिली. नवऱ्याचे पहिले लग्न झालेले होते. हे गौरीला तिच्या लग्नानंतरच समजले. नवरा दारू प्यायचा, तिला मारहाण करायचा. आणि संशय घेऊन ही मारहाण करायचा. या सगळ्याला कंटाळून ती माहेरी निघून आली.
रंजनाताई यांच्या कडून गौरीला केंद्राची माहिती समजली. तिने केंद्रात शिकायला जायचे ठरवले. तिच्या आई वडिलांनीच तिला लातूरच्या सबला महिला केंद्रात आणून सोडले.
केंद्रात शिकून आल्यावर तिने शिवणकाम सुरु केले. शिवण कामातून पैसेही चांगले मिळायला लागले. मग तिने पुनर्विवाह केला. तिचा नवरा एका किराणा दुकानात नोकरी करतो. तिची प्राप्ती नवऱ्यापेक्षा जास्त आहे. तिला एक मुलगा आहे. त्याला मोठे करायचे आहे, शिकवायचे आहे, त्याच्या पायावर त्याला उभे करायचे आहे. हे तिचे ध्येय आहे.
सबला महिला केंद्राने तुला काय दिले यावर तिने अतिशय मार्मिक उत्तर दिले, ती म्हणाली, “जे ज्ञान मला केंद्रात मिळाले ते शाळेतही मिळाले नाही. शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान मिळाले. पुस्तकी ज्ञानापेक्षा सरांच्या अनुभवातून व संध्याताई यांच्या मार्गदर्शनातून खूप शिकायला मिळाले. सर्वच गोष्टी संस्थेत इतक्या व्यवस्थित समजावून सांगितल्या जातात की आईवडील ही इतके समजावून सांगत नाहीत. आई वडिलांनी आपल्या मुलीच्या इच्छा, आशा-आकांक्षा समजून घेतल्या तर भविष्यात मुलींवर येणारे कटू प्रसंग टळतील”
—————————————————————————————————————–