यशस्विनी – १२ (अ) / सीता
लातूर जिल्हयातील बिबराळ गावाची सीता ४ थी पर्यंत शिकलेली होती. तेराव्या वर्षीच तिचे लग्न झाले होते. सगळे तसे ठीक चालले होते. पण वीजेचा शॉक बसला आणि नवरा वारला. आता सासरच्यांनी आधार दयायचे नाकारले. जेमतेम दीड वर्षे सासरी राहून तान्ह्या मुलीला घेऊन सीता माहेरी परतली.
काही काळाने रंजनाताई यांच्याकडून लातूरच्या सबला महिला केंद्राची माहिती तिला मिळाली. सीताने लातूरला केंद्रात शिकायला जायचे ठरवले. घरच्यांचा विरोध नव्हता पण गाववाल्यांनी मात्र फार विरोध केला. पण तिने गाववाल्यांचे ऐकले नाही. सीता केंद्रात शिकायला आली.
सीता लिहायला-वाचायला शिकली. शिवणकाम शिकली. इतरही माहिती तिला प्राप्त झाली. केंद्रामुळे किती बदल तिच्यामध्ये झाला! पूर्वी जरा कोणी काही बोलले की ती दिवसभर रडत बसायची. आता कोणी उगीच काही तिला बोलले तर ती प्रत्युत्तर देते. उगाच कोणाचे बोलणे ती ऐकून घेत नाही. अशा वेळेस तिला आठवतात चाफेकर सर आणि संध्याताई!
सध्या ती शिवणकाम करते. दिवसाला दोन अडीचशे रुपये कमावते. जिजामाता बचत गटाची ती सदस्य आहे. एल आय सी ची तिने पॉलिसी काढलेली आहे. नियमित बचत करते. पोस्टात आर डी भरते. आर्थिकदृष्टया तिच्या परीने ती भक्कम आहे.
मुलीला तिला शिकवायचे आहे. तिच्या पायावर तिला उभे करायचे आहे. घरही बांधायचे आहे. गरजू बायकांना ती मदत करते. आता पर्यंत ५-६ जणींना तिने केंद्रात शिकायला पाठविले आहे.
—————————————————————————————————————–