नको ती निराशा
नको ती निराशा
विलास चाफेकर
वर्तमानपत्रात नुकतीच एक बातमी वाचली. कोरोन या महामारीमुळे लॉकडाऊन झाले. संचारबंदी आली. घराबाहेरपडता येईना. फिरस्त्याचा धंदा बसला. साठवलेले पैसे संपले. आता उदरनिर्वाह कसा चालवणार ? शेवट प्रेम विवाह केलेल्या त्या जोडप्याने स्वतःच्या दोन्ही मुलांना दोरीच्या फासात अडकवले आणि त्या चिमुरड्या गोड मुलांच्या मृत्युनंतर स्वतःच्या गळफासात अडकवले. पाहता पाहता चार माणसांचा एक सुंदरसा संसार पार खलास झाला. टोकाच्या निराशेने त्या जोडप्याला ग्रासले होते.
आत्ताच माझा एक मित्र. त्यालाघशाचा कॅन्सर झाला होता. (कोणतेही व्यसन नसताना !) खूप उपचार झाले. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक उपचारांत कमतरता नाही. खर्चाला खळ नाही. पैसा पाण्यासारखा खर्चाला. शेवट तो बरा झाला. डॉक्टरांनी सांगितलं की, आता यांना भीती नाही. आणि अचानक दोन-तीन दिवसातच तो गेला. त्याला निराशेने इतके ग्रासले होते की, बस ! त्याची समजूत होती की, आपण बरे होणार नाही, आपण मरणार. याच दुखण्यात मरणार आणि तो मेला. निराशेने त्याचे मन भरले होते.आपण बरे होऊ शकतो यावर त्याचा विश्वास नव्हता. खर सांगतोय तुम्हाला. कदाचित विश्वास बसणार नाही. पण या माझ्या मित्राचा कॅन्सर बरा झाला पण तो गेला. या माझ्या प्रेमळ व हळव्या मित्राच्या घशाला कॅन्सर नव्हता, त्याच्या मनालाच कॅन्सर झाला होता.
मनाने निराशा एकदा का पत्करली की, त्यातून सुटका नाही. पहिल्या उदाहरणात त्या प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याने आत्महत्या करून जीवन संपवले. दुसर उदाहरण त्यापुढच. आत्महत्या करण्याची त्या मित्राला गरजच नव्हती. तो कणाकणाने क्षणाक्षणाला मरतच होता. शेवट शरीराने साथ सोडली.मनाने तर ती कधीच सोडली होती.
पूर्वी माणसांमध्ये लढाऊ वृत्ती होती.आता ती वृत्ती लोप पावली की काय ? की, पूर्वी लोकांचं जीवन सरळ साध सोपे होत. आता विकास झाला. विज्ञानात अनेक शोध लागले. तंत्रज्ञान विकसित झालं. अनेक भौतिक साधन माणसाच्या हाती आली, माणसाची इंद्रिय अधिक कार्यक्षम झाली. आता कोणी पन्नाशीतच भिंगाचा चष्मा लाऊन डोळ्यावर आडवाहात ठेवून बघत नाही बसत. चष्म्याच्या आविष्काराने दृष्टी तेज-तरार झाली. पण असं जरी असलं तरी माणस निराश मात्र खूप होतात. निराशा हा मनाचा रोग आहे. आणि तो विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांना व्यापून टाकतो.
शालान्त परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, बारावीला तर आणखी कमी मार्क पडले, हवा त्या शाखेला प्रवेश मिळाला नाही. निराशा आली. नोकरी मिळत नाही. निराशा. पगार पुरेसा नाही, निराशा. प्रेमभंग झाला, निराशा. घरात सारखी भांडण, कटकटी – निराशा. बायकोला मित्राच्या बायकोप्रमाणे कपाटभर साड्या नाहीत, मला हवे तसे त्या ह्यांच्यासारखे कपडे नाहीत, विकएन्डला मुलांना घेऊन पिकनिकला जाता येत नाही, चांगली मोठी गाडी नाही, पेट्रोल फारच महाग. मुलांच्या क्लाससाठी किती फी भरली. पण मुलांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत. उलट आम्हीच त्यांना विश्वासात घेत नाही, जनरेशन ग्याप आहे. म्हणून ती तक्रार करतात. एक ना दोन हजार कारण आहेत. ते रामदास का कोण संत होऊन गेले त्यांच्या म्हणण्याप्रमाणेहा प्रपंच कटकटीनी भरलेला आहे.
निराशेचं भूत मानगुटीवर बसलेलं आहे. कोण कवीने म्हटलय ना की, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’ तसं आपण पराधीन आहोत. अगदी गरीब माणसाला, झोपडपट्टीतल्या माणसाला देखील आपण गरीब आहोत म्हणजे काय आहे ते त्याला कळत. समोरच्या सोसायटीतील त्या ब्लॉकच्या खिडकीतून सगळ दिसत, जे माझ्याकडे नाही.सिनेमातल्या हिरोप्रमाणे दोन ठोसे मारून ते हिसकावून घ्यावं असं वाटत. पण आपण काही त्या हिरोसारखे तगडे नाही. कुठूनअसणार दणकट शरीर ? खायला तर पाहिजे नीट. छीना झपटी करायला गेलो तर आपणच मार खाणार.
मुल सतत मागण्या करतात. हे द्या, ते द्या. शहाणी-सुरती, समजूतदार बायको अधूनमधून तगादा लावतेच, अमुक एक घ्या म्हणून. त्याशेजाऱ्यांकडेगाडी आली. आपण खटारासुद्धा घेऊ शकत नाही.
या मागण्या रास्त आहेत. असतील. पण कशा पुरवणार ? मन अगदी भणभणत. कोणाशी बोलावं म्हणजे ताण कमी होईल, हे समजत. पण कोणाशी बोलणार ? सारेच सारखे. असंतुष्ट, चिडचिडे, सुखी, समाधानी कोणीच दिसत नाही अवती भवती.
योग्य वेळी हव्या त्या माणसाशी संवाद साधता यावा, म्हणूनमोबाईल घेतला. आता जर स्मार्ट फोनही आला. पण तेव्हापासून घरातल्यांशी सुद्धा निगुतीने, सवडीने बोलायला वेळ मिळत नाही. सारच संवाद हरवलाय. ज्ञानेश्वर म्हणतात तशी भक्तांची मांदियाळी नाहीये, सर्वत्र असंतुष्टांचीमांदियाळी पसरलीय, थोडक्यात समाधान कोणालाच नाही. पूर्वी घरी आईस्क्रीम बनवायचे. एका पॉटमध्ये(शेरभराच्या) आठ माणस भरपूर आईस्क्रीम मिळालं म्हणून संतुष्ट असायची. आता समाधान पाहू जाता कोठेच नाही. समाधान, सुख कशात आहे ? भौतिक वस्तूंनी स्वतःच्या ब्लॉक मधली कपाटभरण्यात आहे? सारखी वणवण. भटकंती कशासाठी ? सुख असं मॉलमध्ये मिळत ?
आम्ही असंतुष्ट बनलोय. रोग लागलाय मनाला निराशेचा. आमचं मन असंतुष्टतेच्या पात्रात कडमडतय. त्याचं कंडीशनिंग झालंय. त्यामुळे कशानेही सुख समाधान मिळण्याची सोयच राहिली नाही.
कसं मिळेल सुख ? कसं लाभेल समाधान ? मनाची निराशा कशी घालवता येईल ? प्रत्येक माणूस दिवसाढवळ्या उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पहात असतो. तो त्या स्वप्नात बनतो राजा.
सिंहासनाधिश्वर. पण ते स्वप्न म्हणजे वास्तव नव्हे. स्वप्न भंग पावलं की, आपण खडबडीत जमिनीवर पडलेले आढळतो. तेव्हा स्वप्न आणि वास्तव यातला फरक समजून घ्यायला शिका.
काही जण परमेश्वराची भक्ती करतात. निराशेतून मुक्ती मिळवण्यासाठी. पण हि भक्ती म्हणजे अळवावरचपाणी. हि भक्ती कितपत खरी हो? नामदेव(संत शिरोमणी) जसा कुत्र्याच्या मागे तुपाचीवाटी घेऊन धावला त्यातलं आपल्या भक्तीत आहे ? समोर ठेवलेल्या प्रसादापैकी कणभरही देव खरच खातो असं कळल तर आपण नैवेद्यच दाखवणार नाही, या जातीचे आपण भक्त. या भक्तीने निराशा कशी दूर होणार ? दुसऱ्याशी किती काळ तुलना करणार ? सिनेमात काम करणारी एखादी हिरोईन फार सुंदर वाटली तरी तिची अभिलाषा धरण्यात काय अर्थ ? ती मिळणार नाही. पण म्हणून तिचा द्वेषही करू नका. नटीचे सौंदर्य, शास्त्रज्ञाची बुद्धीमत्ता, गायकाचा आवाज हे आपल्याकडे नाही म्हणून दु:ख कशाला करायचे ? ते या जगात कुठे तरी आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला मिळाला ना? बास. ह्याचे अभिनंदन करा.त्याचा दुस्वास नको. हव्यास नको. केवळ अप्रिसिएशन. त्यात मजा आहे.
टळटलीत दिवसाचा प्रकाश झाकोळून जावा, इतकं आभाळ भरून आलेलं असत. पण काही वेळात ते ढगही पांगतात. पुन्हा प्रकाशान आकाश उजळते. बदल होतों. तो होणारच. तो निसर्गाचा धर्म आहे आणि माणूस निसर्गाचाच अविष्कार आहे. आहे कुठे ती तुमची निराशा ?