“दोन शब्द”
लोहियानगरच्या वस्तीतल्या ऑफिसच्या जागेवर वत्सलाबाई रोज दुपारी येतात. काही ना काही कारण काढून त्या बोलत असतात. सुरुवातीला वाटायचं, त्यांना चहा हवा असणार, म्हणून त्या बरोबर चहाच्या वेळेला येत असतील. पण चहा पिऊन झाला तरी त्या आपल्या जागेवरून हलत नाही.
आम्ही रोज लोहियानगरमध्ये कामाला जात होतो. अनेक जणांना आधार कार्ड, रेशनकार्ड, कोरोनाची लस यासाठी मदत करत होतो. याच बरोबर वस्तीतील ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे आमचं लक्ष होतं. त्याचा नीट अभ्यास करून काय करता येईल याचा विचार चालू होता. वस्तीत दुपारच्या वेळी अनेक वृद्ध माणसं इथं तिथं बसलेली दिसत. प्रत्येकाचं काही ना काही दुखणं होतं. ते त्याला त्यांच्यापरीनं सामोरंही जात होते. कधी कधी अति वेदना होत आणि त्यांचा तोल जाई. ही सगळी वृद्ध मंडळी कुठे ना कुठे मजुरी करत होती. स्त्रिया घरकाम करून पैसे मिळवत असत. वत्सलाबाई सुद्धा घरकाम करत. पण त्या जेव्हा काम करत तेव्हाची आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. वत्सलाबाईना तीन मुलगे होते. त्यांनी घरकाम करून मुलांना मोठे केले आणि त्यांचे लग्न लावून दिले. पण कोरोनाच्या काळात त्यांची तिन्ही मुलं गेली.

वत्सलाबाईच्या दृष्टीने घर आणि मन एकदम रिकामं झालं. ज्या मुलांसाठी त्या जगल्या तीच मुलं आता नाहीत. त्यांचं हे दुःख त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात स्पष्ट दिसतं. पण दुःख करत बसण्याइतकी फुरसत पोटाला नसते. त्यामुळे त्यांच्या सुना वस्तीजवळ असणाऱ्या सोसायट्यांमध्ये घरकाम करायला जाऊ लागल्या. पण त्यांना कामासाठी दुपारी नाहीतर सकाळी लवकर जावं लागतं. कारण तिथं स्वयंपाक करणं, मुलांचे डबे करणं आणि घरातील सर्वच कामे त्यांना करावी लागतात. त्यामुळे त्या पार दुपारी तीन साडेतीनला घरी येतात आणि संध्याकाळी परत सहाला रात्रीच्या कामाला जातात. एवढ्या सगळा वेळ वत्सलाबाई झोपडीत एकट्याच असतात. त्यांना कोणाशी तरी बोलावं वाटतं. पण कोणाशी बोलावं? आजूबाजूच्या सर्वांचीच परिस्थती त्यांच्यासारखी आहेत. ते सर्वजण एकटे पडले आहे. पुढे काय घडणार आहे? हे कोणालाच माहित नाही. समोर आलेलं शिळंपाकं अन्न खायचं आणि दाराकडे बघत बसायचं. हेच त्यांचं दैनंदिन जीवन झालं आहे.
अशी एकेकटी म्हातारी माणसं जशी मध्यमवर्गीय घरात आहेत, तशीच ती वस्तीत सुद्धा आहेत. त्यांनाही कोणाशी तरी बोलावं वाटतं. प्रत्येकवेळी त्यांना काही हवंच असतं असं नाही. साधं बोलणं, तुमचं त्यांच्याकडे लक्ष आहे हे बोलून दाखवणं गरजेचं आहे. अशी माणसं असतील तर त्यांना विचारू या, “काय म्हणताय? बरं आहे ना?
वंचित विकास कार्यालय – 7972086730