जीवन त्यांना कळले हो…………
माझ्या हातात एक लक्ष रुपयांचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला. मी थक्क झाले. वास्तविक एक लक्ष रुपये कितीतरी देणगीदार संस्थेला देत आले आहेत पण हे जरा वेगळं आणि विशेष होतं.
माझ्यासमोर माधवराव आणि सुशीलाताई हे वयस्कर, मध्यमवर्गीय पती-पत्नी बसले होते. माधवरावांनी बोलायला सुरुवात केली. “अहो! आता खरंच कशाचीही गरज उरली नाहीये. सगळा संसार सुखाचा आणि समाधानाचा झाला. मुलाबाळांना आणि लेकीसुनांना जे काही हवं होतं आणि आम्हाला शक्य होतं ते देऊन झालंय आता. वेळीच आवराआवरी केलेली बरी नाही का सुशीला”? सुशीलाताई म्हणाल्या, “ताई! आता तर वय असं झालंय की दागिने देखील पेलवत नाहीत अंगावर. लग्नात हौसेनी गोठ, पाटल्या, तोडे, बोरमाळ सगळं केलं होतं. आता नको वाटतं ते सगळं अंगावर घालायला. परवाच आम्ही दोघांनी माझे सगळे दागिने विकून टाकले. त्याचे जे पैसे आले आहेत ते गरजवंत व्यक्तींना उपयोगाचे व्हावेत म्हणून तुम्हाला देणगीदाखल देतो आहोत. तुम्ही मूत्रपिंड विकारांनी आजारी असलेल्या कुटुंबांना मदत करता ना, त्याच्यासाठी देतो आहोत”.

काही माणसाचं मन आणि दृष्टीकोन कसा असतो बघा ना! किती विरक्ती असू शकते. षड्रिपूंपासून फारकत घेणं इतकं सोपं कसं वाटतं एखाद्याला? या धक्क्यातून मी सावरते न सावरते तोच पुन्हा एकदा ते भेटायला आले आणि त्यांनी निहार आनंद निवास या संस्थेच्या एका उपक्रमाला पुन्हा एक लाख रुपये दिले. अजूनही त्यांना जखमी, अपंग सैनिकांना मदत करायची होती.
आजच्या काळातली माणसांची हाव बघितली की हे किती विशेष वाटतं नाही? अशी माणसं आहेत म्हणून समाज चालतो आहे हे निश्चित. मी स्वत:शीच विचार करत होते. आपल्यातल्या किती जणांना असं करावसं वाटतं? किती जण हे प्रत्यक्षात आणतील?
मी विचारात हरवून गेले होते तेव्हा माधवराव म्हणाले, “मीनाताई! आजच हे घ्या कारण उद्याची काय शाश्वती? फाटलेल्या आभाळाला एखादं तरी ठिगळ लावता आलं तरी धन्य वाटेल” आणि मी भानावर येईपर्यंत ते दोघे उठून उभे राहिले होते. नमस्कार करुन परत फिरले आणि मी मात्र अजूनही विचारांच्या भोवऱ्यात फिरत राहिले होते.
वंचित विकास कार्यालय – 7972086730