आवाहन – Vanchit Vikas

आवाहन

Posted By : VV Staff

सादर नमस्कार,

वंचित विकासचे संस्थापक कै. श्री. विलास चाफेकर यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून गेली ४० वर्षे संस्था समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्था विशेषतः स्त्रिया, मुले आणि जेष्ठ नागरिक यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
आदिवासी मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात याव्यात व बालविवाह थांबावेत या उद्देशाने संस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात पाटणबोरी येथे आदिवासी मुलींसाठी वसतिगृह सुरू केले. या उपक्रमामुळे लहान वयातील मुलींचे विवाह थांबले असून आज अनेक मुली उच्च शिक्षण घेत आहेत. या कामाचा पुढचा टप्पा म्हणून चंडिकादेवी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे सध्या रुग्ण सहाय्यक (Patient Assistant), फॅशन डिझायनिंग, मेंदी, रांगोळी इत्यादी प्रशिक्षण दिले जाते. रुग्ण सहाय्यक प्रशिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची मान्यता मिळालेली आहे.
शरीरविक्रय करणा-या स्त्रियांच्या मुलांसाठी ‘फुलवा’ प्रकल्पाअंतर्गत मुलांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने काम सुरू आहे.
स्त्रियांसाठी सबला महिला केंद्र (पुणे व लातूर) अंतर्गत मार्गदर्शन, प्रशिक्षण व समुपदेशनाचे उपक्रम घेतले जातात. एकटं वाटणाऱ्या व एकट्या राहणाऱ्या स्त्रियांसाठी ‘अभया मैत्रीगट’ मानसिक आधार देणारा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहे. एकल महिलांना ‘अभया’ संबोधावे यासाठी महाराष्ट्रभर महिला हक्कांसाठी कार्यरत अनेक संस्थांच्या सहभागाने अभियान चालू आहे.
मार्च २०१८ पासून काळाची गरज ओळखून संस्थेने ‘संध्याकट्टा’ जेष्ठ नागरिक मैत्रीगटाची स्थापना केली. २०२३ ते २०२५ या कालावधीत वृद्धमित्र प्रकल्पाअंतर्गत पुण्यातील कसबा विश्रामबाग व बिबवेवाडी भागात वस्तीपातळीवरील जेष्ठ नागरिकांसोबत काम करण्यात आले. सध्या हेच कार्य ‘स्नेह’ या नावाने सातत्याने सुरू आहे.
आतापर्यंत ४००० हून अधिक गरजू जेष्ठ नागरिकांना मानसिक व भावनिक आधार, वैद्यकीय शिबिरे, औषधे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
नीहार आनंद निवास, लोहगाव (पुणे) येथील निसर्गरम्य वातावरणात शिबिरे, छोट्या सहली, बैठका, स्नेहमेळावे व कार्यशाळा आयोजित केल्या जात असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मुलांसाठी अभिरुची वर्ग पुणे व संस्थेच्या इतर प्रकल्प क्षेत्रांत नियमितपणे घेतले जातात. ‘निर्मळ रानवारा’ हे मासिक मराठी बालवाचकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचत आहे. तसेच अवयवदान व देहदान याविषयी जनजागृतीचे कार्यही सुरू आहे.
संस्थेच्या कार्यावर आधारित एक माहितीपट आम्ही प्रकाशित केला असून तो यूट्यूबवर उपलब्ध आहे. (https://www.youtube.com/watch?v=PTirSjpajNO)
आपण वंचित विकास यूट्यूब चॅनेलला भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, ही विनंती.
नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्याचा मंगलमय सण या आनंददायी प्रसंगी आपणास व आपल्या परिवारास मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, समृद्धी व यश घेऊन येवो, हीच सदिच्छा.
या शुभारंभाच्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या आमच्या उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आपल्या मोलाच्या सहकार्याची व देणगीरूपी गुढीची नितांत आवश्यकता आहे. आपल्या योगदानातून अनेक गरजूंच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश निर्माण होईल, याची आम्हाला खात्री आहे. आपला व आमचा हा स्नेह असाच कायम राहील, हा विश्वास.
आपले
सुनीता जोगळेकर                                                                                             मीना कुर्लेकर
संचालक                                                                                                          सहकार्यवाह
वंचित विकास                                                                                                    वंचित विकास