अवघा रंग एक झाला
महिला आयोगाच्या निमंत्रणावरून वारीमध्ये सहभागी होण्याची संधी बुधवार दि. 3 जुलै ’19 रोजी आम्हाला मिळाली. फलटणच्या अलीकडे काळज गावामध्ये वारीचा मुक्काम होता. अनेक दिंड्या येत होत्या. देहभान विसरून ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत नाचणारे वारकरी होते. स्त्री-पुरुष, वय, जात, धर्म, ऊन, थंडी, वारा, पाऊस या कशाचेच भान नसणारे मी तू पणाची बोळवण झालेले वारकरी आनंदाने उन्मन झाले होते. त्यांच्यामध्ये आपण मिसळल्यावर आपण कधी त्यांचे झालो हे कळतच नाही. फक्त “अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग”. फक्त माऊली हे एकच नातं हे जाणवत राहते.
व्यावहारिक माहिती द्यायची तर शासनाच्या महिला आयोगाच्या वतीने महिला व आरोग्य योजनांची माहिती देणारा एक रथ तयार केला होता. या रथाद्वारे वारीतील अनेक मुक्कामावर थांबून वारकऱ्यांमध्ये जागृती केली जात होती. या निमित्ताने आमच्याबरोबर असणार्या संस्थेच्या प्रतिनिधींना व आम्हाला वारीतील स्त्री-पुरुषांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
आपण स्त्री-पुरुष समानतेवर काम करतो तोच धागा पकडून बोलल्यावर बायकांना विचारले, एखादा विचार सांगितल्यावर तो पटवून कृतीत यायला किती वेळ लागतो? आपला भारत देश आणि सगळे भारतीय खरच हुशार आहेत. त्यांना नसेल येत इंग्रजी पण विचारांची सम पकडता येते. एखाद दोन बुकही न शिकलेल्या बाईच्या या नेमक्या प्रश्नाचा वेध घेतच समाज प्रबोधनाचे काम अखंडित चालू राहते आणि हे काम करणाऱ्यांना विश्वास येतो की विचाराचे बी पेरले कि एक दिवस ते उगवणार, शिवार फुलणार आणि कृती घडणार.