रानवारा दिवाळी २०१९ अंक : प्रकाशन समारंभ

Event Date : 25-10-2019

करामती आणि आपण

तुम्हीआम्ही लहानपणापासून विविध करामती करीतच लहानाचे मोठे झालो. अर्थात मोठे झाल्यानंतरही आपण अनेकदा करामती करतोच. चेक लिहिताना कधी तारीख चुकवतो, तर कधी रक्कम. आपल्या खात्यातील चेक नवऱ्याच्या किंवा पत्नीच्या खात्यात जमा करतो वगैरे वगैरे.

तर याच ‘करामत’ विषयावर बेतलेला आहे यंदाचा ‘वंचित विकास’ या सामाजिक संस्थेमार्फत प्रकाशित होणारा ‘निर्मळ रानवारा’ हा दिवाळी अंक. 

करामतीवर राजीव तांबे, ल.म.कडू, सरोज टोळे, निखिल खराडकर, कांचनगंगा गंधे आदींनी लेखन केले आहे. याशिवाय छोटुकला चित्रकार मानस पंढरपुरे यावर सोहम आपटे यांनी लिहिलेला लेख वाचनीय आहे. हा छोटुकला त्याचा चित्रकलेचा छंद कसा जोपासतो, हे या लेखात वाचायला मिळेल.

याशिवाय ‘बिच्चारा चिंटू’ ही चित्रकथा, ज्योती जोशी यांची ‘प्रेमाची करामत’ही या अंकात वाचायला मिळेल. आभा भागवत त्यांच्या लेखात ‘करामती निसर्गाच्या की माणसांच्या’ यावर भाष्य करतात, तर मुक्तांगण एक्सप्लोरेटरी या संस्थेविषयी ललितागौरी डांगे यांनी घेतलेली सविस्तर मुलाखतही वाचण्याजोगी आहे.

‘कस्सा पकडला चोर’ ही क्षितिजा देव यांची नाट्यछटा लक्षवेधी आहे. काॅर्नफ्लेक्स या पदार्थाच्या निर्मितीमागची छोटीशी गंमतही नवीन माहिती देते. ‘डोकेबाज विनू’ ही सुनंदा उमर्जी यांची कथा आहे, तर ईशान पुणेकर काकूंच्या क्लीनरची करामत मांडतात.

अंकातील करामती वाचताना दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल, अशी अपेक्षा.

पृष्ठे – १२६, मूल्य – ५० रुपये, संपादक – सुप्रिया कुलकर्णी