यशस्विनी – ७ / नलू

Posted By : Team Vanchit

यशस्विनी – ७

नलू

     एक परित्यक्ता मुलगी आत्मविश्वासाने चार चाकी वाहन लातूरच्या रस्त्यावरून चालवत आहे असे जर कोणी सांगितले तर खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. या मुलीचे नाव आहे नलू.

     नलू चे लग्न वयाच्या १५ व्या वर्षी झाले. सासरी कशीबशी 3 वर्षे नांदली आणि दोन मुले पदरात घेऊन माहेरी आली. नवऱ्याचे लग्नाआधी पासून दुसऱ्या एका मुलीशी संबंध होते. मग त्याने नलूशी लग्न का केले हा प्रश्नच आहे. त्याला तर ती पसंत नव्हतीच पण त्याच्या आई वडिलांना पण ती पसंत नव्हती. तो तिला मानसिक त्रास द्यायचा. दारू पिऊन मारहाणही करायचा. नाईलाजाने ती माहेरी येऊन रहायला लागली. नलू माहेरी येऊन रहायला लागल्यावर इकडे तिच्या नवऱ्याने त्या दुसऱ्या मुलीशी लग्न केले. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेणे व दुसरे लग्न लावणे हा प्रकार येथे नव्हताच. समाज या विरुद्ध ब्र ही काढत नाही. नलूने मात्र कोर्टात नवऱ्या विरुद्ध भांडण लावले.

     रंजनाताईकडून नलूला वंचित विकास केंद्र संचालित सबला महिला केंद्र, लातूर ची माहिती मिळाली. घरच्यांना सांगून नलू केंद्रात शिकायला आली.

     केंद्रात शिक्षण घेतल्यावर नलू आपल्या गावी परत गेली. कपडे शिवू लागली. काही महिन्यानंतर ती परत लातूरला आली. ती किरायाने खोली घेऊन राहू लागली. नलू ९ वी पास झालेली होती. त्यामुळे रुग्णालयात ती रिसेप्शनिस्टची (स्वागतिका) नोकरी करू शकली. केंद्रात आरोग्यविषयक जे शिक्षण मिळाले होते त्याचाही तिला उपयोग झाला. आजही नलू त्या रुग्णालयामध्येच नोकरी करते. आता तिला चांगला पगार मिळत आहे.

     दोन्ही मुलांना तिने गावाकडे आईकडेच ठेवले आहे. आईला ती दरमहा पैसे पाठवते. घरी आल्यावर फावल्यावेळात ती कपडे शिवण्याचे ही काम करते. ती नियमित बचत करते. एका बचत गटाची ती अध्यक्ष आहे. हौस म्हणून ती कार चालवायला शिकली. तिला तिच्या माहेरी, गावाकडे चांगला मान सन्मान मिळतो. आई वडिलांची ती “कर्ता मुलगा” झालेली आहे.

     कोर्टातील भांडण आठ वर्षे चालले. शेवटी निकाल तिच्या बाजूने लागला. सासरकडून 3 एकर जमीन व सव्वा लाख रुपये नुकसान भरपाई पोटी तिला मंजूर झाले. तिच्या आयुष्यातील हा सुवर्ण दिवस होता.

     आता, अडचणीत सापडलेल्या बायांना ती आधार देते. अडचणीत असलेल्यांना लातूरच्या सबला महिला केंद्रात पाठवते. “सर आणि संध्याताई यांच्यामुळे माझ्या जगण्याला पालवी फुटली” असे ती म्हणते.

     गावाकडे तिला घरकुल मिळाले आहे. लातूर मध्येही तिला घर बांधायचे आहे. मुलांना इंजिनीअर करायचे आहे. आता तरी ती गावच्या सरपंचपदी निवडून येण्याचे स्वप्न पहात आहे.

————————————————————————————————————–