यशस्विनी – २ – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/logo.jpg

यशस्विनी – २

Posted By :

हिरकणी

हिरकणी ही लातूर जिल्ह्यातील रायवाडीची. दिसायला तशी किरकोळ पण काटक. काळीसावळी पण स्मार्ट. तिचे शिक्षण १२ वी पर्यंत झालेले होते. १८ व्या वर्षी तिचे लग्न लावून देण्यात आलेले होते. लग्नानंतर तिच्या लक्षात आले की नवऱ्याला ‘बाहेरचा नाद’ आहे. त्या बाईचे ऐकून तो तिला मारहाण करायचा. हा अन्याय होता. तिला त्याची चीड होती. चार दिवसातच ती माहेरी परत आली. पण घरात राहून गुदमरायला व्हायचे. वंचित विकासची कार्यकर्ती रंजनाताई हिच्याकडून तिला सबला महिला केंद्र, लातूरची माहिती मिळाली. घरच्यांची परवानगी घेऊन ती केंद्रात शिकायला आली.

केंद्रातील वातावरणामुळे व विविध विषयांच्या शिक्षणामुळे तिच्यामध्ये  बदल होऊ लागला. तिला शिक्षणाची आवड नव्हती. केंद्रात आल्यावर तिच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली. तिला व्यावहारिक ज्ञान काहीच नव्हते. ते केंद्रामध्ये मिळाले. घराबाहेरचे जग तिला माहीतच नव्हते. ते हळूहळू माहित होऊ लागले.

केंद्रातील शिक्षण पूर्ण करून ती घरी गेली. तिने १२वी ची परीक्षा दिली. पोलीसखात्यात  भरतीसाठी अर्ज केला. पोलीस होण्याची तिची फार इच्छा होती. ती म्हणते, “सरांमुळे (वंचित विकासचे संस्थापक श्री. विलास चाफेकर) मी पोलीस दलात जाण्याचा निश्चय केला. त्यांनी मला सर्व माहिती दिली. काय परिश्रम घ्यायचे, व्यायाम कसा करायचा याची माहिती दिली.” पूर्वी घराबाहेर एकटीने जाण्याची तिला भीती वाटत असे. पण आता तिच्यात धीटपणा आलेला होता. ती कोठेही एकटी जाते.

काही दिवसातच तिच्या अर्जाचा विचार करून तिला पोलीस विभागातर्फे बोलावणे आले. सध्या अंबेजोगाई येथे प्रशिक्षण चालू आहे. सुट्टीत ती घरी येते व शिवणकाम करते.

केंद्रात अंधश्रद्धा विरोधी कार्यक्रम तिने पाहिला होता. शिकून गेल्यानंतर अंधश्रद्धाळू बायकांची अंधश्रद्धेतून सुटका करण्याचा प्रयत्न तिने सुरु केला. अन्यायाविरुद्ध कसे लढायचे हे ही ती महिलांना शिकविते. धर्मापुरी जवळ एक खेडे आहे. तेथे हिरकणी समोर एका महिलेला तिच्या नवऱ्याने खूप मारले. ती बेशुद्ध पडली. तिच्याजवळ कोणीच नव्हते. तेंव्हा हिरकणीने पोलीसांना फोन करून खबर दिली.पोलीस आले. त्यांनी तिच्या नवऱ्याला व सासू-सासऱ्यांना पकडून नेले. हिरकणीने त्या महिलेला तिच्या आईकडे सुखरूप सोडले. प्रवासात असताना बस चा ड्रायव्हर एका मुलीला बस मध्ये बसू देत नव्हता. तेंव्हा हिरकणीने पुढे होऊन ड्रायव्हरला इतके झापले की तो म्हणाला,’ तुम्ही मला येथे भेटलात तेवढे पुरे झाले, तुमच्या पाया पडतो, पुन्हा कोठेही भेटू नका.’

ती अन्याय सहन करीत नाही. इतर कोणावर अन्याय होत असेल तर तेथेही ती धावून जाते. हे धाडस वंचित विकास मुळेच आले. असे ती म्हणते. पोलीस खात्यात भरती व्हायचे व समाजाची सेवा करायची हे तिचे ध्येय आहे. हिरकणी आता महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेली आहे. तिचे पोस्टींग नंदुरबार येथे झालेले आहे.

———————————————————————————-