सगळी कामं सगळ्यांची – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/12/सगळी-कामं-सगळ्यांची.jpg

सगळी कामं सगळ्यांची

Posted By :

  “madam तुम्ही काय बी बोलताय” पराग आपल्या तोंडाला हात लावत हसत म्हणाला.

त्याच्या बरोबर त्याचे मित्र सुद्धा, “असं नसतंच कधी” असं म्हणत मला समजावत होते.

   मराठवाड्यातल्या एका छोट्या गावातल्या शाळेत ७-८ वर्षांच्या मुला-मुलीबरोबर गप्पा मारत होते. गोष्ट सांगून झाली,वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून झाले तरी त्यांना अजून काहीतरी करायचं होतं.म्हणून त्यांना विचारलं की तुम्ही काय काय कामं करतात? त्याची यादी करू या.”

    मुलींनी कामाची यादी केली त्यात होतं- चहाचे कप विसळणे, शिरईने घर आणि अंगण झाडणे, हापश्यावरून पाणी आणणे, शाळेत जाणे,दप्तर भरणे,अभ्यास करणे,जेवणाच्या ताटल्या उचलणे आणि त्या घासणे.

तर मुलांच्या यादीत होतं –झोपणे आणि जेवणे. याला ते काम म्हणत होते.म्हणून त्यांना विचारलं, “तुम्ही आईला मदत करायला पाहिजे,असं तुम्हांला वाटतं का?” यावर परागने मुलांच्यावतीने हसत विचारलं, “madam तुम्ही काय बी बोलताय.”

या मुलांनी वयाच्या ७-८ वर्षापासून आपलं काम कोणतं हे ठरवून टाकलं आहे. सरळ आहे हे सगळं ते आपल्या आजुबाजूला असणारे पुरुष काय करतात हे बघूनच ठरवलं आहे. मुलींनीच आईला मदत करायची,घरातली सगळी कामं त्यांनीच करायची.हे सगळं मुलं बघतात आणि तेच बरोबर आहे असं त्यांना त्यामुळेच वाटतं.म्हणूनच लहान वयातील मुलांशी बोलायला हवं. काम हे काम असतं,ते जसं लहान-मोठं नसतं तसंच ते फक्त स्त्रियांनी करावं,पुरुषांनी करू नये असं काही नसतं.हे मुलांना वारंवार सांगायला हवं.नाहीतर ते एका जीवन कौशल्यापासून वंचित राहतील. स्वतंत्रपणे जीवन जगतांना त्यांच्यात अनेक कमतरता येतील.याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती  आई-बहीण आणि स्त्रिया जे काम करतात त्यांना बिनमहत्वाचं समजतील.जे आजपर्यंत अनेक पुरुषांनी केलं आहे.

म्हणूनच मुलांशी बोलायला हवं.त्यांना त्यांचे विचार,भावना समजून घेवून ते बदलण्यास मदत करायला हवी. ते जो विचार करतात तो का चुकीचा आहे हे ही सांगायला हवं.हिच ती योग्य वेळ आहे. बोलायला हवं, सगळी कामं सगळेजण मग तो मुलगा असो की मुलगी करू शकतो.ती फक्त मुलींच्या वाटणीची नाहीत.

वंचित विकास – ७९७२०८६७३०