यशस्विनी-११ (अ) / सायरा – Vanchit Vikas

यशस्विनी-११ (अ) / सायरा

Posted By :

     शिवणकाम शिकायचे तर किमान टेप वरील आकडे तरी कळले पाहिजेत. मापे कळली पाहिजेत. सायरा केंद्रात आली तेंव्हा तिचे काहीच शिक्षण झालेले नव्हते. तिला शाळेत कधी घातलेलेच नव्हते. त्यामुळे तिला केंद्रात गमभन शिकण्या पासून सुरुवात करावी लागली. पण जिद्दीने ती शिकली. कंटाळली नाही. कंटाळून चालणारच नव्हते. तशीच तिची परिस्थिती होती.

     सायरा लग्न झाले तेव्हा पंधरा वर्षांची होती. नवरा सतत दारू प्यायचा. त्याचा दारू गाळण्याचा व्यवसाय होता. तो सायराला म्हणायचा तूही दारू गाळ. तिला दारू गाळणे, दारू विकणे याची भीती वाटत होती. त्यामुळे तिने यास नकार दिला. नवऱ्याने तिला रोज मारहाण करण्यास सुरुवात केली. सहा महिन्यातच ती माहेरी पळून आली.

     सबला महिला केंद्र, लातूर येथून शिकून गेलेल्या महिलेकडून तिला केंद्राची माहिती मिळाली. तिने घरच्यांना विचारले. भाऊ जा म्हणाला. ती केंद्रात आली.

     केंद्रातील शिक्षण झाल्यावर सायरा  बहिणीच्या गावी गेली. तिच्याकडेच राहिली. तेथे तिने शिवणकामाचा व्यवसाय सुरु केला. हजारो रुपये साठवले.तिचे वडील बरेच आजारी होते. त्यांच्या आजारपणाचा वीस हजार रुपये खर्च सायरानेच केला. आता ती घरातील कर्त्या मुलाप्रमाणे वागत होती. घर चालवत होती.

     नंतर तिचा दुसरा विवाह झाला. त्याचा खर्च तिने स्वतःच केला. हा नवरा शिलाई काम  करतो. वागायला चांगला आहे. संसार सुखात चालला आहे. आता तिला एक बाळ पण झाले आहे.

     मुलाला तिला चांगले शिकवायचे आहे. मूल ४-५ महिन्यांचे झाल्यावर पुन्हा शिवणकामास सुरुवात करायची आहे. तिला कपड्याचे दुकान ही सुरु करायचे आहे. नवऱ्याबरोबर छान संसार करायचा आहे.  आपल्यासारख्या अडचणीत सापडलेल्या बायकांना आधार दयायचा आहे. वंचित विकास बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हे सारे ती मनापासून बोलत होती.  

——————————————————————————————————————–